उर्दू भाषेच्या विद्यार्थ्यांना मराठीचा गोडवा!; मराठीत मुख्यमंत्री, महापौरांना लिहिली हजारो पत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2019 06:55 PM2019-02-27T18:55:44+5:302019-02-27T18:59:20+5:30
उर्दू भाषेप्रमाणेच त्यांना मराठीचा गोडवा वाटावा म्हणून पत्रलेखनाचा उपक्रम.
- मुजीब देवणीकर
औरंगाबाद : मोबाईलच्या युगात शालेय विद्यार्थ्यांना आज पोस्टकार्ड काय आहे? हे माहीतच नाही. तीन दशकांपूर्वीपर्यंत पोस्ट विभागामार्फत पत्रव्यवहार करण्यात येत होता. या दुर्मिळ आठवणींना उजाळा देण्याचे काम रीड अॅण्ड लीड फाऊंडेशनने सुरू केले आहे. उर्दू भाषेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनाही मराठीचा गोडवा वाटावा म्हणून मराठीत मुख्यमंत्री, महापौर यांच्या नावाने विविध विषयांवर पत्र लिहून घेण्यात येत आहेत. बुधवारी मराठी भाषा दिनानिमित्त आणखी व्यापक प्रमाणात हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती मिर्झा अब्दुल खय्युम नदवी यांनी दिली.
जानेवारी २०१९ पासून रीड अॅण्ड लीड फाऊंडेशनने शहरातील उर्दू भाषेच्या विविध शाळांमध्ये शुद्ध मराठी पत्रलेखन स्पर्धा घेण्यात आली. या उपक्रमाला विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे संयोजकांकडून शहरातील सर्वच उर्दू भाषेच्या शाळांमध्ये मराठी पत्रलेखन स्पर्धा घेण्याचे निश्चित करण्यात आले. २७ फेब्रुवारी रोजी मराठी राजभाषा दिवस साजरा करण्यात येत आहे. त्या निमित्ताने शहरातील ५७ उर्दू हायस्कूल, २५५ प्राथमिक शाळांमध्ये पत्रलेखन स्पर्धा घेण्यात येणार आहे. २५ हजार पोस्टकार्ड आतापर्यंत पोस्टाकडून घेण्यात आले आहेत. त्यातील १६ हजार विद्यार्थ्यांनी ते लिहून दिले आहेत.
विद्यार्थ्यांना ‘माझ्या शहराला भेट दिलीच पाहिजे कारण...’, ‘माझ्या शहरातील चांगला माणूस’, ‘माझ्या शहरातील प्रेक्षणीय स्थळ’, ‘आमच्या शहरातील अडचणी’, ‘माझे आवडते पुस्तक’, असे विषय देण्यात आले होते. मराठी भाषा दिनानिमित्त जास्तीत जास्त पत्र विद्यार्थ्यांकडून मराठी भाषेत लिहून घेण्यात येणार आहेत. या दिनाचे औैचित्य साधून विद्यार्थ्यांनी शाळेत फक्त मराठी भाषेतच संभाषण केले पाहिजे यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे नदवी यांनी नमूद केले. या उपक्रमाला ‘उड्डाण’ या संस्थेने सहकार्य केले आहे.
उर्दू भाषेच्या विद्यार्थ्यांना मराठीत लिहिणे, वाचणे सहसा अवघड जाते. अनेक शाळांमध्ये द्वितीय भाषा मराठी असते. शाळेत विद्यार्थ्यांना मराठी बोलता येते, वाचता येते. अवघड विषय म्हणून अनेक विद्यार्थी मराठीकडे फारसे गांभीर्याने लक्ष देत नाहीत. त्यामुळे उर्दू भाषेप्रमाणेच त्यांना मराठीचा गोडवा वाटावा म्हणून पत्रलेखन सुरू करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.