औरंगाबाद जिल्ह्यातील हजारो शालेय विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 06:58 PM2018-12-31T18:58:32+5:302018-12-31T19:01:38+5:30
जे अद्यापही शिष्यवृत्तीपासून वंचित आहेत. त्यांच्यात संभ्रमाचे वातावरण पसरले आहे.
औरंगाबाद : अस्वच्छ व्यवसाय करणाऱ्या पालकांच्या पाल्यांना दिली जाणारी शिष्यवृत्ती व सावित्रीबाई फुले शिष्यवृत्तीसाठी यंदा शासनाकडून पुरेशी तरतूद प्राप्त नसल्यामुळे जिल्ह्यातील हजारो मागासवर्गीय शालेय विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिले आहेत. अगोदर याद्या प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती देण्यात आली; पण जे अद्यापही शिष्यवृत्तीपासून वंचित आहेत. त्यांच्यात संभ्रमाचे वातावरण पसरले आहे.
जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गामधील विद्यार्थ्यांना अस्वच्छ व्यवसाय शिष्यवृत्ती, सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, गुणवत्ता शिष्यवृत्ती दिली जाते. मागील वर्षापासून सदरील लाभार्थी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या हस्तांतरण योजनेनुसार (डीबीटी) रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. या शिष्यवृत्तीसाठी खाजगी अनुदानित, विनाअनुदानित, जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिकेच्या शाळांमध्ये शिकणारे अनु. जाती, जमाती, वि.जा.भ.ज. प्रवर्गातील विद्यार्थी पात्र आहेत.
यंदा जि.प. समाजकल्याण विभागाकडे अस्वच्छ व्यवसाय करणाऱ्या पालकांच्या पाल्यांचे ६ हजार ९९४ अर्ज प्राप्त झाले होते; परंतु समाजकल्याण विभागाकडे अस्वच्छ व्यवसाय शिष्यवृत्तीसाठी अपुरी तरतूद प्राप्त झाल्यामुळे अवघ्या २ हजार ७७९ विद्यार्थ्यांच्या खात्यावर शिष्यवृत्तीची रक्कम जमा करण्यात आली. सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती ही दोन टप्प्यांत वितरित केली जाते.
यामध्ये इयत्ता पाचवी ते सातवी व इयत्ता आठवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यंदा या शिष्यवृत्तीसाठी इयत्ता पाचवी ते सातवीपर्यंतच्या अनुसूचित जाती प्रवर्गातील ५ हजार ४०५ विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज व जि.प. समाजकल्याण विभागाकडे मुख्याध्यापकांकडून प्रमाणित याद्या प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी २ हजार विद्यार्थ्यांसाठी पुरेल एवढीच तरतूद प्राप्त असल्यामुळे या विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात शिष्यवृत्तीची रक्कम जमा करण्यात आली. यासाठी अगोदर प्राप्त झालेल्या याद्यांना प्राधान्य देण्यात आले. तब्बल ३ हजार ४०५ विद्यार्थी या शिष्यवृत्तीच्या प्रतीक्षेत आहेत. अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी ५० लाख रुपयांची तरतूद आहे.
विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्गातील ७ हजार ४८० विद्यार्थ्यांनी आॅनलाईन अर्ज भरले होते. त्यांच्या याद्याही समाजकल्याण विभागाला प्राप्त झाल्या; पण निधीअभावी अवघ्या २ हजार २४८ विद्यार्थ्यांनाच या शिष्यवृत्तीची रक्कम वितरित करण्यात आली. या प्रवर्गाचे ५ हजार २०० विद्यार्थी या शिष्यवृत्तीच्या प्रतीक्षेत आहेत. यासाठी समाजकल्याण विभागाने शासनाकडे २५ लाख रुपयांच्या निधीची मागणी केली आहे.
तरतूद आहे; पण वितरण थांबले
इयत्ता आठवी ते दहावीपर्यंत शिकणाऱ्या अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना दिली जाणाऱ्या सावित्रीबाई फुले शिष्यवृत्तीसाठी ५० लाखांची तरतूद प्राप्त आहे; पण समाजकल्याण विभागाने ६ हजार ४२२ पैकी २ हजार ८०० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली. ३ हजार ६२२ विद्यार्थी याद्या पडताळण्याच्या नावाखाली शिष्यवृत्तीपासून वंचित आहेत. दुसरीकडे, विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्गातील ६ हजार ७८४ विद्यार्थ्यांपैकी ४ हजार विद्यार्थ्यांच्या खात्यावर शिष्यवृत्ती जमा केली. आणखी २ हजार ६०० विद्यार्थी याद्या पडताळणीच्या नावाखाली शिष्यवृत्तीच्या प्रतीक्षेत आहेत.