बँक खात्याअभावी हजारो विद्यार्थ्यांना मिळेना गणवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2017 12:50 AM2017-08-05T00:50:29+5:302017-08-05T00:50:29+5:30
शासकीय योजनेचा लाभ थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा व्हावा यासाठी शासन आग्रही आहे; परंतु आवश्यक पूर्वतयारी न करता घेतलेल्या निर्णयांमुळे लाभार्थ्यांची गैरसोय होत आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शासकीय योजनेचा लाभ थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा व्हावा यासाठी शासन आग्रही आहे; परंतु आवश्यक पूर्वतयारी न करता घेतलेल्या निर्णयांमुळे लाभार्थ्यांची गैरसोय होत आहे. जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना देण्यात येणाºया गणवेश योजनेची स्थिती काहीशी अशीच आहे. स्वातंत्र्यदिन जवळ आलेला असताना बँक खाते नसल्यामुळे सुमारे पन्नास हजार विद्यार्थी आजही गणवेशापासून वंचित आहेत.
सर्व शिक्षा अभियानांतर्गत जिल्हा परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळेतील १ ते ८ वी पर्यंत शिकणाºया सर्व मुली, अनुसूचित जाती जमाती व दारिद्र्य रेषेखालील मुलांसाठी शासनाकडून मोफत गणवेश योजना राबवली जाते. पूर्वी विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी तयार गणवेश दिला जात असे. मात्र २०१७-१८ या शैक्षणिक वर्षापासून शाळेत तयार गणवेश देण्याऐवजी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात प्रती गणवेश २०० रुपयांप्रमाणे दोन गणवेशासाठी ४०० रूपये जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला. सर्व शिक्षा अभियानाच्या या वर्षीच्या नियोजनानुसार १ लाख १७ हजार २०० विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी गणवेश देण्याबाबत कार्यवाही सुरू करण्यात आली. शिक्षण विभागाकडून गटशिक्षणाधिकाºयांच्या खात्यावर आठ तालुके मिळवून चार कोटी ६८ लाख ८० हजारांची अनुदान रक्कम वर्ग करण्यात आले. मात्र ग्रामीण भागातील शाळांमध्ये शिक्षण घेणाºया बहुतांश विद्यार्थ्यांकडे आधार सलग्न बँक खातेच नाही. त्यामुळे गणवेश रक्कम कोणत्या खात्यावर पाठवायची हा प्रश्न मुख्यध्यापकांना पडला आहे. काही मुख्याध्यापक पालकांना तुम्ही सध्या स्वत: चे पैसे खर्च करून गणवेश घेऊन या. बील शाळेत जमा करा. बँक खाते उघडल्यानंतर गणवेशाची रक्कम जमा केली जाईल, असे तोंडी सांगत आहेत. विद्यार्थ्यांचे बचत खाते उघडण्यासाठी बँका टाळाटाळ करत असल्याने ग्रामीण भागातून येणाºया पालकांचा वेळ व पैसा वाया जात आहे. काही बँका शून्य रकमेवर विद्यार्थ्यांचे खाते उघडण्याऐवजी खात्यात हजार रुपये जमा ठेवण्यास सांगत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
चारशे रुपयाच्या गणवेशासाठी हजार रुपये जमा करून बँक खाते उघडणे सोयीचे नसल्याचे पालक सांगत आहेत. जिल्ह्यातील पन्नास टक्के लाभार्थी विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाची रक्कम अद्यापही मिळाली नसल्याचे एका अधिकाºयाने सांगितले.