बी.कॉम.च्या एका विषयात हजारो विद्यार्थ्यांना मिळाले शून्य गुण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 05:17 PM2021-06-16T17:17:15+5:302021-06-16T17:18:10+5:30
Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabad बी.कॉम.च्या पहिल्या सत्राचा कॉम्प्युटर ॲप्लिकेशन विषयाचा पेपरमध्ये तांत्रिक गोंधळ
औरंगाबाद : विद्यापीठाने सोमवारी जाहीर केलेल्या बी.कॉम.पहिल्या सत्राच्या कॉम्प्युटर ॲप्लिकेशन या विषयात बहुतांशी विद्यार्थ्यांना शून्य गुण मिळाले आहेत. दरम्यान, परीक्षेतील तांत्रिक अडचणीचा फटका हजारो विद्यार्थ्यांना बसला असावा, असा कयास पालकांनी काढला असून यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण पसरले आहे.
दुसऱ्या दिवशी अनेक स्थानिक विद्यार्थी, पालक, विद्यार्थी संघटनांनी परीक्षा विभागाकडे धाव घेऊन यासंदर्भात विचारणा केली; मात्र परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. योगेश पाटील यांनी बी.कॉम. अभ्यासक्रमाच्या पहिल्या सत्राच्या काॅम्प्युटर ॲप्लिकेशन विषयाच्या परीक्षेत दिलेला पेपर आणि त्याची ‘अन्सर की’ हे बरोबर असल्याचे सांगत विद्यार्थीच पेपर सोडविण्यात कमी पडले असावेत, असा निष्कर्ष काढला.
विशेष म्हणजे, या अभ्यासक्रमाच्या अनेक हुशार विद्यार्थ्यांना दुसऱ्या विषयात पैकीच्या पैकी गुण मिळाले आहेत. केवळ या एकाच विषयात त्यांना शून्य गुण मिळाल्यामुळे संभ्रमात पडले आहेत. या विषयाचा संपूर्ण पेपर सोडविल्यानंतर काही तरी गुण मिळायला हवे होते. शून्य गुण मिळूच शकत नाहीत, असा दावा विद्यार्थ्यांनी केला आहे. ऑनलाईन परीक्षेच्या वेळी ‘सॉफ्टवेअर’मध्ये तांत्रिक बिघाड झालेला असावा, त्यामुळे बहुसंख्य विद्यार्थ्यांना शून्य गुण मिळाले असावे, असे पालकांचे म्हणणे आहे.
मंगळवारी विद्यार्थी काँग्रेसचे (एनएसयूआय) मोहित जाधव, पंकज सपकाळ, मित्रवर्धन काळे, उदयसेन काळे, शार्दूल उबाळे, अथर्व शेटे, धर्मराज देशमुख आदी पदाधिकाऱ्यांनी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक योगेश पाटील यांची भेट घेतली व या विषयाच्या पेपरची पुनर्तपासणी करुन सरसकट सर्व विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करावे, अशी मागणी केली.
निवेदन सादर
बी.कॉम. पहिल्या सत्राच्या काॅम्प्युटर ॲप्लिकेशन या विषयाच्या पेपरची पुनर्तपासणी करुन सरसकट सर्व विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करावे, या मागणीचे निवेदन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक योगेश पाटील यांना विद्यार्थी काँग्रेसचे (एनएसयूआय) मोहित जाधव, पंकज सपकाळ, मित्रवर्धन काळे, उदयसेन काळे आदी पदाधिकाऱ्यांनी सादर केले.