विहार परिसरातील हजारो वृक्षांची झाली राख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:06 AM2021-03-13T04:06:40+5:302021-03-13T04:06:40+5:30
औरंगाबाद : अलीकडच्या काळात डोंगरमाथ्यावरील वनराईला आग लावून वणवा भडकविण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. शुक्रवारी विद्यापीठामागे लेणी क्रमांक ७ ...
औरंगाबाद : अलीकडच्या काळात डोंगरमाथ्यावरील वनराईला आग लावून वणवा भडकविण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. शुक्रवारी विद्यापीठामागे लेणी क्रमांक ७ जवळ विजयिन्द अरण्य बुद्धविहारालगत अज्ञात माथेफिरूने आग लावल्याने विहार परिसरातील सुमारे ३ हजारांहून अधिक झाडे जळून खाक झाली.
भदन्त अभयपुत्र महाथेरो यांनी तात्काळ अग्निशामक दल व पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानुसार अग्निशामक दलाचा एक बंब घटनास्थळी पोहोचला व त्यांनी अथक परिश्रमातून दोन तासांनंतर आग आटोक्यात आणली. बेगमपुरा ठाण्याचे पोलीसही घटनास्थळी पोहोचले होते.
शुक्रवारी दुपारी साधारणपणे ३ वाजेच्या सुमारास कोणी तरी विहार परिसरातील झाडांजवळील पालापाचोळ्याला आग लावली. बघताबघता आगीने रौद्ररूप धारण केले व परिसरातील सुमारे ३ हजारांपेक्षा अधिक झाडे जळून गेली. ही घटना समजताच शेकडो उपासक, हितचिंतकांनी विहाराकडे धाव घेतली. त्यांनी आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला; परंतु आग अधिकच भडकत होती. शेवटी अग्निशामक दलाचा एक बंब घटनास्थळी पोहोचला व त्यांनी आगीवर नियंत्रण मिळविले.
भदन्त अभयपुत्र महाथेरो यांनी लेणी क्रमांक ७ जवळ डोंगरालगत गेल्या चार-पाच वर्षांपूर्वी विजयिन्द अरण्य बुद्धविहाराची उभारणी केली असून, तेव्हापासून त्यांनी परिसरात जेसीबीच्या साहाय्याने खड्डे करून हजारो झाडे लावली होती. भन्तेजींनी कठीण परिस्थितीत या वृक्षांची जोपासना केली होती. त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते भीमराव हत्तीअंबिरे यांनीही याठिकाणी दरवर्षी वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेऊन हजारो झाडे लावली व त्यांचे संवर्धनही करीत होते. सध्या हा परिसर पूर्णपणे हिरवाईने नटला होता. विहाराचा विकास व रम्य वातावरण पाहून समाजकंटकांनी हेतूपूरस्कर ही आग लावली, असा आरोप भदन्त अभयपुत्र महाथेरो यांनी केला आहे.