गोयल घोटाळ्यात नाव आल्याची धमकी; ASI चे सहायक अधीक्षक डिजिटल अरेस्ट, १२ लाख गेले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2024 18:51 IST2024-12-21T18:51:04+5:302024-12-21T18:51:55+5:30

जेट एअरवेजच्या नरेश गोयल घोटाळ्यात नाव आल्याची धमकी; चक्क मित्रांकडून पैसे उधार घेऊन द्या, सायबर गुन्हेगारांचा धमकीवजा सल्ला

Threat of being named in Naresh Goyal scam; ASI Assistant Superintendent digitally arrested, Rs 12 lakhs lost | गोयल घोटाळ्यात नाव आल्याची धमकी; ASI चे सहायक अधीक्षक डिजिटल अरेस्ट, १२ लाख गेले

गोयल घोटाळ्यात नाव आल्याची धमकी; ASI चे सहायक अधीक्षक डिजिटल अरेस्ट, १२ लाख गेले

छत्रपती संभाजीनगर : देशभरात गाजलेल्या जेट एअरवेजच्या नरेश गोयल मनी लाँड्रिंग प्रकरणात तुमचे नाव निष्पन्न झाल्याची धमकी देत एका शासकीय अधिकाऱ्यालाच डिजिटल अरेस्टच्या जाळ्यात अडकवण्यात आले. सलग तीन दिवस संपर्क साधून त्यांना तब्बल १२ लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला. याप्रकरणी गुरुवारी बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर ही बाब उघडकीस आली.

मूळ नागपूरचे असलेले ५२ वर्षीय प्रशांत सोनोने (ह. मु. पहाडसिंगपुरा) हे पुरातत्व खात्यात सहायक अधीक्षक आहेत. ७ डिसेंबर रोजी दुपारी त्यांना अनोळखी क्रमांकावरून कॉल प्राप्त झाला. कॉल वरील व्यक्तीने मुंबई क्राइम ब्रँचमधून बोलत असल्याची थाप मारून त्यांच्या आधार कार्डचा नरेश गोयल घोटाळ्यात गैरवापर झाल्याचे सांगून तुम्हाला डिजिटल अरेस्ट करत असल्याची धमकी दिली. बँक खात्याची खातरजमा करण्यासाठी व सर्वोच्च न्यायालयाचे शुल्क म्हणून सुरुवातीला ९९ हजार रुपये भरण्याची ताकीद दिली. सोनोने यांनी साफ नकार देऊनही सायबर गुन्हेगारांनी त्यांना ब्लॅकमेल केले. घाबरलेल्या सोनोने यांनी तत्काळ त्यांना ९९ हजार रुपये ऑनलाइन पाठवले.

मग टोळी पैसे मागत गेली
विविध चार ते पाच क्रमांकांवरून सायबर गुन्हेगारांनी सोनोने यांना बँक खात्याची माहिती देण्यासाठी धमकावणे सुरू केले. सोनोने देखील माहिती देत गेले. दोन दिवसांनी त्यांना आणखी व्हेरिफिकेशनच्या नावाखाली ११ लाख रुपयांची मागणी करण्यात आली. सोनोने यांनी ते देखील आरटीजीएसद्वारे पाठवले.

मग मित्राकडून उधार घ्या...
तिसऱ्या दिवशी सायबर गुन्हेगारांनी सोनोने यांना बँकेतून कर्ज घेण्यास सांगितले. सोनाेने यांनी त्यासाठी वेळ लागणार असल्याचे सांगितल्यानंतर सायबर गुन्हेगारांनी त्यांना मित्रांकडून दहा लाख रुपये उधार घ्या व आम्हाला द्या, अशी धमकीवजा सल्ला दिला. याचदरम्यान सोनाेने यांना आपली फसवणूक होत असल्याचा संशय आला व त्यांनी गुन्हेगारांना प्रतिसाद देणे बंद केले.

देशभरात गोयलच्या नावाने अडकवले
सप्टेंबर २०२३ मध्ये जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक झाली. या घोटाळ्याच्या नावाने सायबर गुन्हेगारांनी वाराणसी, लखनऊ, कुल्लू येथील सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना ३ कोटीं पेक्षा अधिक रुपयांचा गंडा घातला. विशेष म्हणजे ते घोटाळ्यांचे कागदपत्र देखील पाठवतात.

Web Title: Threat of being named in Naresh Goyal scam; ASI Assistant Superintendent digitally arrested, Rs 12 lakhs lost

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.