सीएसटी, कुर्ला, दादर स्टेशन उडवून देण्याची धमकी; एकजण औरंगाबादमधून ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2022 05:38 PM2022-12-07T17:38:35+5:302022-12-07T17:41:25+5:30
मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षातील ११२ क्रमांकावर मंगळवारी रात्री एकाने फोन करून तीन रेल्वे स्टेशन उडवून देण्याची धमकी दिली
वाळूज महानगर (औरंगाबाद) : मुंबई शहरात बॉम्ब हल्ले करण्याची धमकी देणाऱ्या एकास मंगळवारी मध्यरात्री एमआयडीसी वाळूज पोलिसांनी रांजणगावात जेरबंद केले. पंजाब शिवानंद थोरवे (३३, रा.रांजणगाव) असे धमकी देणाऱ्याचे नाव आहे. विक्षिप्त स्वभाव व दारुच्या नशेत त्याने धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षातील ११२ क्रमांकावर मंगळवार (दि.५) रात्री ९.५० वाजेच्या सुमारास एका अनोळखी व्यक्तीने ७८२०९०२२५६ या क्रमांकावरुन फोन करुन मुंबईच्या कुर्ला, दादर, सीएसटी या ठिकाणी बॉम्ब हल्ले करणार असल्याची धमकी दिली. बॉम्ब हल्ले करण्यासाठी हल्लेखोर घोडबंदर गुजरात मार्गे मुंबईत येणार असल्याची माहिती देखील त्याने नियंत्रण कक्षाला दिली. यामुळे सतर्क झालेल्या मुंबई पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे फोन करणाऱ्याचा शोध घेतला. तो औरंगाबादेतील वाळूजमध्ये आढळला. या माहितीवरून एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप गुरमे यांच्या मार्गदर्शनाखाली पोकॉ.युसुफ शेख, पोकॉ.सागर यांनी रांजणगावात शोध घेतला. परंतु, त्याचा मोबाईल बंद आढळून आला. त्यानंतर मुंबई रेल्वे गुन्हे शाखेचे सहा.पोलिस निरीक्षक सचिन लोखंडे यांनी तत्काळ दुसरा क्रमांक शोधला. त्यावर संपर्क केला रामेश्वर बागडे याने धमकी देणाऱ्या मोबाईल वापरकर्त्याचे नाव पंजाब शिवानंद थोरवे असे असून तो महिनाभरापूर्वी आपल्याकडे कामाला असल्याचे सांगत रांजणगावात वास्तव्यास असल्याची माहिती दिली. ओळख पटताच पोलिस पथकाने रामेश्वर बागडे यास सोबत घेऊन रात्री उशिरा पंजाब शिवानंद थोरवेस (३३) रांजणगावातून ताब्यात घेतले.
दारुचे व्यसन व नैराश्यातून केले कृत्य
आरोपी पंजाब थोरवे हा मुळचा डोळेपांघरा, ता.लोणार, जि.बुलढाणा) येथील रहिवाशी असून त्याला मद्याचे व्यसन असून वाहनचालक म्हणून त्याने काही दिवस काम केले आहे. मात्र चोरी केल्याने त्यास कामावरुन काढून टाकले होते. वर्षभरापूर्वी पंजाब थोरवेने पत्नी व मेव्हणीचे अश्लिल फोटो समाजमाध्यांमावर व्हायरल केले होते. या प्रकरणी त्याच्याविरुध्द एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल आहे. त्याच्या विक्षिप्त स्वाभावमुळे पत्नीही त्याच्याजवळ रहात नाही. विक्षिप्त स्वभावाच्या पंजाब थोरवे याने नैराश्य व दारुच्या नशेत मुंबईत बॉम्ब हल्ला करण्याची धमकी दिल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. या धमकी प्रकरणी आरोपी पंजाब थोरवे विरुध्द एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपनिरीक्षक सचिन पागोटे हे करीत आहेत.