देशाच्या सुरक्षेला धोका; अमेरिका, सौदीमधून आलेले ५३ हजार आंतरराष्ट्रीय कॉल दाखवले स्थानिक

By सुमित डोळे | Published: June 10, 2023 12:22 PM2023-06-10T12:22:52+5:302023-06-10T12:23:43+5:30

मुंबईच्या नेटवर्क कंपनीचा धक्कादायक घोटाळा; सायबर पोलिसांकडून छापा, व्यवस्थापक अटकेत

threat to national security; 53 thousand international calls from US, Saudi showed local | देशाच्या सुरक्षेला धोका; अमेरिका, सौदीमधून आलेले ५३ हजार आंतरराष्ट्रीय कॉल दाखवले स्थानिक

देशाच्या सुरक्षेला धोका; अमेरिका, सौदीमधून आलेले ५३ हजार आंतरराष्ट्रीय कॉल दाखवले स्थानिक

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : सेव्हन स्टार डिजिटल नेटवर्क प्रा. लि. या कंपनीने सेटअप तयार करून आयएलडी परवानाधारक गेट वे बायपास करुन हजारो आंतरराष्ट्रीय कॉल्स बेकायदेशीरपणे स्थानिक कॉल म्हणून वळवले. ज्यामुळे विदेशातून येणारे आयएसडी कॉल्स हे स्थानिक कॉल्स म्हणून नोंदवले गेले. परिणामी, शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडवला गेलाच; परंतु देशाची सुरक्षाच भेदून त्याने हा प्रकार केल्याने अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. दूरसंचार सेवा देणाऱ्या टाटा कंपनीने सायबर पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर जालना रस्त्यावरील कंपनीच्या कार्यालयात छापा टाकून व्यवस्थापक सन्नी देवेंद्र (रा.छत्रपती संभाजीनगर) याला अटक केली.

इंटरनेट व इतर नेटवर्क सुविधा पुरवणाऱ्या या कंपनीने जालना रस्त्यावरील सागर ट्रेड सेंटरच्या एका गाळ्यात कार्यालय थाटले होते. सदर कंपनीच्या विनंतीवरून टाटा टेलिसर्व्हिसेस कंपनीने त्यांना एसआयपी ट्रंक सर्व्हिस देण्यासाठी अटी शर्ती पूर्ण करून करार केला. त्या अंतर्गत कंपनीने सुविधा पुरवण्यास सुरुवात केल्याने एसआयपी ट्रंक वापरण्यास सुरुवात केली. मे महिन्यात मात्र टाटा टेलिसर्व्हिसेस कंपनीला स्टार डिजिटल नेटवर्क कंपनी बेकायदेशीर पद्धतीने ॲप, सॉफ्टवेअरमध्ये बदल करून आयएसडी कॉल्स एसटीडी म्हणून मार्गस्थ करत आहे. याची पडताळणी केली असता दोन महिन्यांत असे अनेक कॉल्स स्टार डिजिटल नेटवर्क कंपनीने वळवले असल्याचे समजले. त्यानंतर टाटा टेलिसर्व्हिसेस कंपनीचे नोडल अधिकारी धनंजय यादव यांनी कंपनीच्या आदेशावरून शहर पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलिस आयुक्त धनंजय पाटील, सायबरच्या पोलिस निरीक्षक प्रवीणा यादव यांनी तपास सुरू केला. गुरुवारी त्यांच्या सूचनेवरून उपनिरीक्षक राहुल चव्हाण, सुशांत शेळके, वैभव वाघचौरे, अभिलाष चौधरी यांनी छापा टाकला. तेव्हा सन्नी देवेंद्रला ताब्यात घेत झडती घेत आंतरराष्ट्रीय कॉल्स बायपास करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त केले.

नेमकी काय आहे गेटवे बायपास प्रक्रिया?
टाटा टेलिसर्व्हिसेस कंपनी डीओटी कार्यालयाचा परवाना घेऊन दूरसंचार सेवा पुरविते. ग्राहकांना आंतरराष्ट्रीय कॉल्सची (आयएलडी) सेवा मिळण्यासाठी त्यांनी विदेश संचार निगम लि. कंपनीसोबत करार आहे. विदेशातून भारतात येणारे व भारतातून बाहेर जाणारे कॉल केवळ आयएलडी परवानाधारकांनाच अधिकृत आहेत. या कॉलचे आदानप्रदान आंतरराष्ट्रीय गेटवेद्वारे करणेच आवश्यक असते. खासगी कंपनी कॉल इतरत्र वळवू शकत नाही.

मग सेव्हन स्टार कंपनीने काय केले ?
या कंपनीला टाटाकडून एक हजार कनेक्शन मिळाले होते. त्यातही ते केवळ नेटवर्कसाठी व मुंबईपुरतेच मर्यादित होते. मात्र, त्यांनी चुकीच्या पद्धतीने सेटअप करून आयएलडी परवानाधारक गेटवे बायपास केली. त्या आधारे आंतरराष्ट्रीय कॉल्स स्थानिक कॉल्स म्हणून रूपांतरित झाले. कॉल विदेशातून येत होते. मात्र, त्याची नोंद स्थानिक म्हणून होत गेली. हे कॉल्स कुठल्याही सुरक्षा यंत्रणेला ट्रेस करता येत नाही. म्हणून हा राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका समजला जातो. शिवाय, आंतरराष्ट्रीय कॉल्सचा दर, परवान्याची किंमत कोटीत असल्याने शासनाचा महसूलदेखील बुडाला.

सर्वाधिक कॉल्स या देशातून
पोलिसांच्या माहितीनुसार, दोन महिन्यांत या कंपनीने गेटवे बायपास करून तब्बल ५३ हजार ७०३ कॉल वळविले. यातील बहुतांश अमेरिका, सौदी, बहरीन, ऑस्ट्रेलिया देशांतून आले आहेत. या बेकायदेशीर कॉल्सची ओळख पटविता येत नसल्याने देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण झाल्याचे पोलिस, टाटाच्या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

Web Title: threat to national security; 53 thousand international calls from US, Saudi showed local

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.