बनावट क्रमांक दुचाकीवर टाकणारे तीनजण अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:05 AM2021-03-28T04:05:07+5:302021-03-28T04:05:07+5:30
औरंगाबाद : परिवहन कार्यालयात दुचाकीची नोंदणी न करता, बनावट क्रमांक टाकून फसवणूक करणाऱ्या तिघांना पोलिसांनी वेगवेगळ्या कारवाईत ...
औरंगाबाद : परिवहन कार्यालयात दुचाकीची नोंदणी न करता, बनावट क्रमांक टाकून फसवणूक करणाऱ्या तिघांना पोलिसांनी वेगवेगळ्या कारवाईत अटक केली आहे. ही कारवाई २५ मार्च रोजी सायंकाळी गांधीनगर आणि सिडकोत करण्यात आली.
गौतम सतपाल चावरिया आणि सचिन शाम लाहोट (दोघे रा. गांधीनगर) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांच्या नाकाबंदी दरम्यान संशयावरून पोलिसांनी आरोपींची दुचाकी रोखली. यावेळी केलेल्या चौकशीत परिवहन (आरटीओ) कार्यालयात दुचाकीचे पासिंग न करता, दुचाकीवर बनावट क्रमांक टाकल्याचे समोर आले. ही फसवणूक उघड झाल्यावर पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध क्रांतिचौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. अन्य एका घटनेत बायकोच्या ॲक्टिवा गाडीचा क्रमांक स्वतःच्या नव्या दुचाकीवर टाकणाऱ्या संजय लक्ष्मण हिरे पाटील (रा. शिवनेरी कॉलनी) याला पोलिसांनी अटक केली. त्याच्याविरूद्ध पोलीस हवालदार संजयसिंह राजपूत यांनी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. संजयने नवी दुचाकी खरेदी केल्यावर परिवहन कार्यालयाकडे कर (टॅक्स) भरून नोंदणी केली नाही. पोलिसांची नजर चुकविण्यासाठी त्याने बायकोच्या दुचाकीचा क्रमांक आपल्या दुचाकीवर टाकला. मात्र, तो पोलिसांच्या चाणाक्ष नजरेखालून सुटला नाही.