औरंगाबाद येथे अखेर बेकायदेशीर गर्भपात करणा-या बोगस डॉक्टर महिलेसह तीन अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 01:05 AM2017-11-27T01:05:37+5:302017-11-27T01:05:41+5:30
भालगाव येथे अवैध गर्भपात केंद्र चालविणा-या महिलेला रविवारी दुपारी मुकुंदवाडी परिसरातील संघर्षनगर येथे तर संमतीविना विवाहितेचा गर्भपात करणा-या तिच्या पती आणि नंदईला बजाजनगर येथे पुंडलिकनगर पोलिसांनी सापळा रचून पकडले.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : भालगाव येथे अवैध गर्भपात केंद्र चालविणा-या महिलेला रविवारी दुपारी मुकुंदवाडी परिसरातील संघर्षनगर येथे तर संमतीविना विवाहितेचा गर्भपात करणा-या तिच्या पती आणि नंदईला बजाजनगर येथे पुंडलिकनगर पोलिसांनी सापळा रचून पकडले.
बोगस डॉक्टर ललिता मून ऊर्फ खाडे (रा. आपत भालगाव), तक्रारदार महिलेचा पती सुनील वाघ आणि नंदई बापू डिघोळे (रा. बजाजनगर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. याविषयी अधिक माहिती देताना पुंडलिकनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अशोक आव्हाड यांनी सांगितले की, पुंडलिकनगर येथील विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ करून तिच्या सासरच्या मंडळींनी तिच्या संमतीविना गर्भपात केला होता. गतवर्षी झालेल्या या घटनेप्रकरणी विवाहितेने पुंडलिकनगर ठाण्यात मागील आठवड्यात गुन्हा नोंदविला. या गुन्ह्याच्या तपासात तिचा गर्भपात करण्यात आलेल्या आपत भालगाव येथील ललिता मून ऊर्फ खाडे या बोगस डॉक्टर महिलेच्या घरावर वैद्यकीय अधिकाºयांना सोबत घेऊन पोलिसांनी छापा मारला असता तेव्हा तेथे तिने घरातच अवैध गर्भपात केंद्र सुरू केल्याचे समोर आले. तेथे मोठ्या प्रमाणावर गर्भपाताच्या औषधींचा साठा पोलिसांनी जप्त केला. हा साठा जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे देण्यात आला आहे. छाप्यानंतर पोलिसांनी ललिता मून ऊर्फ खाडे हिला नोटीस देऊन दुसºया दिवशी ठाण्यात हजर राहण्यास सांगितले. मात्र अटकेच्या भीतीपोटी ती पसार झाली होती. दरम्यान, सहायक पोलीस निरीक्षक अशोक आव्हाड, कर्मचारी गणेश डोईफोडे, कल्पना जांभोटकर, बाळाराम चौरे, जालिंदर मांटे, विशेष पोलीस अधिकारी संतोष बोधक आणि गुट्टे यांच्या पथकाने आरोपी खाडे हिला मुकुंदवाडीतील संघर्षनगर येथून तर तक्रारदार महिलेचा पती सुनील वाघ आणि नंदई बापू डिघोळे यांना बजाजनगर भागातून अटक केली. अवैध गर्भपात केंद्र चालविण्याचे स्वतंत्र कलम गुन्ह्यात वाढवून त्याबाबतच्या अहवालासह सर्व आरोपींना सोमवारी न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे सपोनि आव्हाड यांनी सांगितले.