हज कमिटीचे चेअरमनपद मिळवून देण्याच्या आमिषाने तीन जणांनी केली बांधकाम व्यावसायिकाची ३३ लाखांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 12:35 AM2018-11-18T00:35:57+5:302018-11-18T00:36:23+5:30
औरंगाबाद : हज कमिटीच्या चेअरमनपदी नियुक्ती करून देतो, असे आमिष दाखवून मुंबई-दिल्लीतील तीन जणांनी औरंगाबादेतील बांधकाम व्यावसायिकाचे तब्बल ३३ ...
औरंगाबाद : हज कमिटीच्या चेअरमनपदी नियुक्ती करून देतो, असे आमिष दाखवून मुंबई-दिल्लीतील तीन जणांनी औरंगाबादेतील बांधकाम व्यावसायिकाचे तब्बल ३३ लाख रुपये उकळल्याचे समोर आले. याप्रकरणी बेगमपुरा ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून, आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी तपास करीत आहेत.
खालेद राहगीब (रा. नवी दिल्ली), परवेज आलम (रा. शाहीन बाग, ओकला, नवी दिल्ली) आणि आबुसाद (रा.मुंबई), अशी आरोपींची नावे आहेत. याविषयी अधिक माहिती अशी की, जयसिंगपुरा येथील रहिवासी बांधकाम व्यावसायिक मोहंमद आरेफोद्दीन नूरद्दीन सिद्दीकी (४३) यांना त्यांच्या व्यवसायाची दूरदर्शनवर जाहिरात करायची होती. त्यानिमित्त २०१५ मध्ये आरेफोद्दीन हे त्यांचे मित्र हाफीज खालेद आणि मौलाना सादिक (ह.मु. औरंगाबाद, मूळ रा. भोपाळ, मध्यप्रदेश) यांच्यासोबत मुंबईला गेले होते. तेव्हा सादिक यांनी त्यांना सांगितले की, दिल्ली दूरदर्शनमध्ये खालेद राहगीब हे कार्यरत असून, ते तुम्हाला जाहिरातीसाठी मदत करतील, तसेच सादिक यांनी खालेद यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधून आरेफोद्दीनसोबत बोलणे करून दिले. त्यानंतर ते औरंगाबादेत परतले. काही दिवसांनंतर आरेफोद्दीन आणि परवेज यांच्यात मोबाईलवर बोलणे झाले.
२७ जानेवारी २०१५ रोजी दिल्लीहून आरोपी खालेद राहगीब आणि परवेज आलम हे औरंगाबादेत आले. त्यांच्या राहण्याची आणि जेवणाची हॉटेलमधील व्यवस्थाही मोहंमद आरेफोद्दीन यांनीच केली. त्यांच्यात जाहिरातीसंदर्भात चर्चाही झाली. जाहिरात देण्यासाठी मुंबईला जावे लागेल, असे खालेद आणि परवेज म्हणाले. त्यानंतर दोन ते तीन दिवसांनी खालेद, परवेज आणि मौलाना सादिक हे आरेफोद्दीन यांना सोबत घेऊन मुंबईला गेले. दुसऱ्या दिवशी तेथील हॉटेलमध्ये गप्पा मारत असताना खालेद म्हणाला की, परवेज यांची महाराष्ट्र सरकारमधील अधिकाºयांशी घनिष्ट ओळख आहे. ते तुम्हाला हज कमिटीच्या चेअरमनपदी सहज नियुक्ती करून देऊ शकतात. परवेज, खालेद यांनी आरेफोद्दीन यांची मुंबईतील मोठ्या लोकांसोबत ओळख करून त्यांचा विश्वास संपादन केला होता.
या दोघांच्या गळाला लागलेल्या आरेफोद्दीन यांनी हज कमिटीचे चेअरमन होण्याची तयारी दर्शविली. हे पाहून परवेजने या नियुक्तीसाठी ३३ लाख रुपये भरण्याची तयारी ठेवा, असे सांगितले. त्यालाही आरेफोद्दीन तयार झाले; मात्र पैसे घेण्यासाठी औरंगाबादला यावे लागेल, अशी अट आरेफोद्दीन यांनी घातली. त्यास होकार देऊन परवेज दिल्लीला गेला आणि आरेफोद्दीन मित्रासह औरंगाबादला परतले.
काही दिवसांनी परवेजने आरेफोद्दीनशी संपर्क साधून तुमचे नियुक्ती पत्र तयार होत आहे; परंतु पैसे अगोदर द्यावे लागतील, असे सांगितले. त्या आमिषाला बळी पडत आरेफोद्दीन यांनी परवेजला २३ लाख रुपये रोख दिले. उर्वरित दहा लाख रुपये नियुक्तीपत्र मिळाल्यानंतर देण्याचे ठरले होते. त्यानंतर परवेजने पुन्हा आरेफोद्दीन यांच्याशी संपर्क साधून पैसे पाठविण्याचे सांगितले. त्यानुसार आरेफोद्दीन यांनी त्यांचा मुलगा अब्दुल कदीरमार्फत नवी दिल्ली येथे खालेदला दहा लाख रुपये पाठवून दिले.
पैैसे उकळताच तोडला संबंध
आरेफोद्दीन यांच्याशी सतत फोनवर संपर्क साधणाºया परवेज, खालेद आणि आबुसाद यांनी ३३ लाख रुपये उकळल्यानंतर हज कमिटी चेअरमनपदी नियुक्तीपत्र तर दिलेच नाही; पण त्यांच्याशी संबंधही तोडला. यामुळे पैसे परत करा, अशी मागणी आरेफोद्दीन यांनी त्यांच्याकडे केली. एवढेच नव्हे तर आरेफोद्दीन आणि त्यांच्या मित्रांनी वेळोवेळी मुंबई आणि दिल्ली येथे परवेज, खालेद अणि आबुसाद यांची भेट घेऊन आणि मेसेज पाठवून पैसे परत करण्याची विनंती केली; मात्र त्यांनी पैसे परत केले नाहीत. शेवटी आरेफोद्दीन यांनी त्यांच्याविरोधात विश्वासघात करून ३३ लाखांची फसवणूक केल्याची तक्रार आर्थिक गुन्हे शाखेकडे नोंदविली. पोलीस निरीक्षक श्रीकांत नवले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक अमोल सातोदकर यांनी चौकशी करून याप्रकरणी गुन्हा नोंदविला. पोलिसांचे पथक आरोपींना पकडण्यासाठी दिल्लीला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.