तीन दिवस उलटले; ९०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीची दुरुस्ती नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 17:15 IST2025-01-23T17:13:27+5:302025-01-23T17:15:01+5:30
निखळलेल्या पाईपचे जाॅईंट व्यवस्थित करून बसविण्यासाठी एवढे दिवस लागतात का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

तीन दिवस उलटले; ९०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीची दुरुस्ती नाही
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणतर्फे टाकण्यात आलेल्या ९०० मिमी जलवाहिनीचे पाईप सोमवारी दुपारी फारोळा येथे निखळले. तीन दिवस उलटल्यानंतरही जलवाहिनीची दुरुस्ती करण्यात मजिप्राला यश आले नाही. निखळलेल्या पाईपचे जाॅईंट व्यवस्थित करून बसविण्यासाठी एवढे दिवस लागतात का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सहा ते आठ महिन्यांपूर्वीच २०० कोटी रुपये खर्च करून जायकवाडी ते फारोळ्यापर्यंत ही जलवाहिनी टाकण्यात आली. जलवाहिनीचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाल्याचे ‘लोकमत’ने यापूर्वीच प्रकाशित केले. त्यानुसार जलवाहिनीचे पाईप जागोजागी निखळत आहेत. विशेष बाब म्हणजे जलवाहिनीतून सध्या १० ते १२ एमएलडी पाणी येत आहे. पूर्ण क्षमतेने ७५ एमएलडी उपसा सुरू झाल्यावर जलवाहिनीचे आणखी बिंग फुटणार आहे. सोमवारी दुपारी दोन वाजता फारोळा येथे जलवाहिनीचे पाच पाईप निखळले. मंगळवारी ते दुरुस्त करून चाचणी घेतली. त्यानंतर पुन्हा मोठी गळती निदर्शनास आली. बुधवारी दिवसभर मजिप्राकडून काम सुरू होते. रात्री उशिरापर्यंत त्यांना यश आले नव्हते.
गेवराई येथेही गळती
पैठण रोडवरील गेवराई गाव येथेही ९०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीला मोठे लिकेज आहे. ही गळती बंद करण्यासाठी तज्ज्ञ अधिकाऱ्यांनी जलवाहिनी सुरू असताना आजूबाजूला सिमेंट काँक्रीट टाकले. त्यानंतरही गळती थांबली नाही. तीन दिवसांचे शटडाऊन असतानाही येथील लिकेजचे काम करण्यात आले नाही.