विवाहितेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या तरुणास तीन दिवस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:05 AM2021-02-09T04:05:31+5:302021-02-09T04:05:31+5:30
औरंगाबाद : स्वयंपाकाची भांडी घेण्यासाठी गेलेल्या नातेवाईक विवाहितेवर बळजबरीने लैंगिक अत्याचार करून याची वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या ...
औरंगाबाद : स्वयंपाकाची भांडी घेण्यासाठी गेलेल्या नातेवाईक विवाहितेवर बळजबरीने लैंगिक अत्याचार करून याची वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या भामट्यास छावणी पोलिसांनी सोमवारी पहाटे गजाआड केले. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता बुधवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी वाय. जी. दुबे यांनी दिले.
बबुंदर ऊर्फ विकास धरमजित पाल (वय ३१, रा. जामुल, नेवरी, जि. सोनभद्र, उ.प्र., ह.मु औरंगाबाद) असे आरोपीचे नाव आहे.
२२ वर्षीय पीडिता, तिच्या पती व मुलांसह जानेवारी २०२० मध्ये कामाच्या शाेधार्थ शहरात आली होती. शहरातील एका म्हशीच्या गोठ्यात पीडिता व तिचा पती काम करीत असून गोठ्याच्या मागेच एका खोलीत ते राहतात. त्यांचा एक नातेवाईकही त्यांच्याशेजारील एका म्हशीच्या गोठ्यात काम करीत असून तोही तेथेच राहत होता. ४ फेब्रुवारी २०२० रोजी दुपारी साडेबारा वाजता पीडितेचा पती हा गोठ्याची साफसफाई करीत असताना त्याने पीडितेला जेवण बनविण्यासाठी सांगितले. मात्र, जेवण बनविण्यासाठी भांडी नसल्याने ती आरोपीच्या घरी गेली. तेथे आरोपीने पीडितेवर लैंगिक अत्याचार केला व याची वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हा दाखल होताच आरोपी पसार झाला होता. गुन्ह्याचा तपास करून पोलिसांनी आरोपीविरोधात दोषारोपपत्र सादर केले. दरम्यान, १ फेबुवारी रोजी आरोपी न्यायालयात हजर झाल्याने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला ८ फेब्रुवारी रोजी हर्सूल कारागृहातून ताब्यात घेतले. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता, सहायक सरकारी वकील योगेश सरोदे यांनी आरोपीची वैद्यकीय तपासणी करायची असून गुन्ह्याबाबतही चौकशी बाकी असल्याने आरोपीला पोलीस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाकडे केली.