तीन दिवस सुट्या, दिवाळीतच करावा लागणार बंडखोर, अपक्षांसोबत मनधरणीचा फराळ
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2024 12:35 PM2024-11-01T12:35:26+5:302024-11-01T12:37:06+5:30
१, २ व ३ नोव्हेंबर रोजी सुटीमुळे अर्ज मागे घेता येणार नाही तर ४ तारीख शेवटची आहे
छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात प्रमुख पक्षांच्या उमेदवारांना दिवाळसणात बंडोबांना थंड करण्यासाठी धावपळ करावी लागणार आहे. मत विभाजन होईल, अशा बंडखोर, अपक्ष उमेदवारांकडे मनधरणीचा फराळ ते करतील. जिल्ह्यात महायुती आणि महाविकास आघाडीकडून उमेदवारी न दिल्यामुळे नाराज झालेल्यांनी बंडाचे निशाण फडकावले. जवळपास सर्व बंडखोरांनी दाखल केलेले अर्ज वैध ठरले आहेत. त्यामुळे ४ तारखेपर्यंत उमेदवारांना बंडखोरांचे उंबरठे झिजवावे लागणार आहेत. फुलंब्रीमध्ये महायुतीत, पूर्वमध्ये महाविकास आघाडी, वैजापूरमध्ये महायुतीत लक्षवेधी बंडखोरी झालेली आहे. पक्षाकडून अर्ज दाखल केला असला तरी बी फॉर्म नसल्यामुळे बंडखोरांचे अर्ज अपक्ष म्हणून ग्राह्य धरले आहेत. ३९७ उमेदवारांचे अर्ज वैध होते. गुरुवारी पूर्व मतदारसंघातून एकाने अर्ज मागे घेतला.
आजपासून तीन दिवस सुट्या
तीन दिवस शासकीय सुट्या आहेत. १ ते ३ नोव्हेंबरपर्यंत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे कार्यालय सुरू राहतील. परंतु उमेदवारी अर्ज या काळात मागे घेता येणार नाही. त्यामुळे ४ नोव्हेंबरपर्यंत ज्या-ज्या अपक्ष, बंडखाेरांकडे मनधरणीचा फराळ होईल, त्यांची गर्दी ४ नोव्हेंबर रोजी अर्ज मागे घेण्यासाठी होणार आहे.
मतदारसंघ........ अर्ज वैध ठरलेले उमेदवार
सिल्लोड ..... ३५
कन्नड ... ४३
फुलंब्री : ६५
औरंगाबाद मध्य ३५
औरंगाबाद पश्चिम : २८
औरंगाबाद पूर्व : ६८ (एका अपक्षाची माघार)
पैठण विधानसभा : ५१
गंगापूर : ४५
वैजापूर विधानसभा : २६