पावसासाठी कवडगाव येथे मुस्लिम बांधवांची तीन दिवस नमाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 11:18 PM2019-07-13T23:18:28+5:302019-07-13T23:18:39+5:30
औरंगाबाद तालुक्यातील कवडगाव (अंबड) व कवडगाव ( जालना) अशा दोन्ही गावांतील मुस्लीम बांधवांनी पाऊस पडावा म्हणून गावच्या शिवेवर शुक्रवारपासून नमाज अदा करण्याचा उपक्रम सुरू केला आहे.
श्रीकांत पोफळे /शेंद्रा : औरंगाबाद तालुक्यातील कवडगाव (अंबड) व कवडगाव ( जालना) अशा दोन्ही गावांतील मुस्लीम बांधवांनी पाऊस पडावा म्हणून गावच्या शिवेवर शुक्रवारपासून नमाज अदा करण्याचा उपक्रम सुरू केला आहे. रविवारी या उपक्रमाचा शेवटचा दिवस असून, हिंदू बांधवांच्या वतीने मुस्लिम बांधवांना अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात येणार आहे. शिवाय ग्रामस्थांच्या वतीने जनवरांना सुद्धा रविवारी नमाज अदा करण्यासाठी त्याठिकाणी हजर करणार आहेत.
पाऊस हा प्रत्येक सजिवासाठी, प्रत्येक जाती धर्मातील घटकासाठी सारखाच गरजेचा आहे. त्यात तीन वर्षांपासून औरंगाबाद जिल्हा सतत दुष्काळाच्या छायेत असल्याने पशुधनाला लागणारे पिण्याचे पाणी सुद्धा विकत घेण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली होती. त्यामुळे सगळेच आता आपापल्या कुलदैवतांना आपल्या परीने प्रार्थना करताना दिसत आहे. त्याची प्रचीती शुक्रवारी आषाडी एकादशीनिमित्ताने आली. जिल्ह्यात सगळीकडेच विठुरायाला पावसासाठी साकडे घालण्यात आले.
अशाच पद्धतीने औरंगाबाद तालुक्यातील दोन्ही कवडगावातील मुस्लिम बांधवांनी गावाच्या शिवावर सामूहिक नमाज अदा करण्याचा निर्णय घेतला. परिसरात खरिपाची पेरणी ४० टक्केच झालेली आहे. जनावरांना पिण्यासाठी आजही शेतकऱ्यांना पाणी विकत घ्यावे लागत आहे. याठिकाणी रविवारी शेवटची नमाज अदा केली जाणार आहे. सध्या पाण्यावाचून मुक्या जनावरांचे हाल होत असून, निदान या मुक्या जनावरांसाठी तरी पाऊस पडावा, अशी दुआ मुस्लिम बांधव करणार आहेत.