सिल्लोड-भोकरदन रस्त्यावर भीषण अपघातात ३ ठार, २ गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 01:03 AM2018-03-30T01:03:37+5:302018-03-30T11:00:07+5:30
लग्नपत्रिका वाटप करून भोकरदनहून शिवना गावाकडे परतणाऱ्या एका मोटारसायकलला समोरून येणा-या मोटारसायकलने समोरासमोर धडक दिली. या अपघातानंतर एका मोटारसायकलला समोरून येणा-या अज्ञात वाहनाने चिरडले.
सिल्लोड/भोकरदन : लग्नपत्रिका वाटप करून भोकरदनहून शिवना गावाकडे परतणाऱ्या एका मोटारसायकलला समोरून येणा-या मोटारसायकलने समोरासमोर धडक दिली. या अपघातानंतर एका मोटारसायकलला समोरून येणा-या अज्ञात वाहनाने चिरडले. या विचित्र अपघातात एका मोटारसायकलवरील तीन जण ठार झाले. यात नवरदेवाचाही समावेश आहे. भोकरदन-सिल्लोड रस्त्यावरील मालखेडा पाटीजवळ गुरुवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात झाला.
जितेंद्र रतन जगताप (२२), राहुल सदाशिव जगताप (२३), नवरदेव राहुल एकनाथ जगताप (२२, तिघेही रा. शिवना, ता. सिल्लोड) अशी मृतांची नावे आहेत, तर दुस-या मोटारसायकलवरील शुभम बाबूराव तळेकर, प्रज्ज्वल फुसे (दोघे रा. भोकरदन) हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर भोकरदन येथे उपचार सुरू आहेत. तसेच तिन्ही मृतदेह सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी हलविण्यात आले आहेत. भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
शिवना येथील हे तिघेही तरुण इब्राहिमपूर येथून जितेंद्र याच्या बहिणीकडे लग्नाची मूळपत्रिका देऊन सिल्लोडकडे दुचाकीने (क्रमांक एम.एच.२० ईएन ०४६६) येत होते. राहुल याचे १ एप्रिल रोजी लग्न ठरले होते, तर भोकरदन येथील शुभम तळेकर व प्रज्ज्वल फुसे हे सिल्लोडहून शुभमच्या बहिणीच्या लग्नाच्या पत्रिका वाटून परतत होते.
मदतीऐवजी बघे चित्रीकरणात व्यस्त
दोन्ही दुचाकींची समोरासमोर धडक झाल्यानंतर या सर्वांना दोन तास उपचार मिळाले नाहीत. राहुल सदाशिव जगताप व जितेंद्र जगताप हे जागीच ठार झाले, तर राहुल एकनाथ जगताप हा गंभीर जखमी झाल्याने त्याला औरंगाबाद येथे उपचारासाठी नेत असताना फुलंब्रीजवळ त्याची प्राणज्योत मालवली. रस्त्यावर बघ्यांची मोठी गर्दी झाली असली तरी रस्त्यावर तडफडत पडणाºयांच्या मदतीसाठी कुणीही पुढे आले नाहीत. जो तो घटनास्थळाचे फोटोसेशन करण्यात मग्न असल्याचे विदारक चित्र दिसले. यानंतर अपघाताची माहिती मिळताच शिवसेनेचे महेश पुरोहित, भगवान बैनाडे, सरदार राजपूत, अजय थारेवाल, सिद्धार्थ जाधव यांनी घटनास्थळी धाव घेऊन तातडीने मदतकार्य केले.
राहुलचे १ एप्रिलला होते लग्न
राहुल एकनाथ जगताप हा मित्रांना मोटारसायकलवर सोबत घेऊन स्वत:च्या लग्नपत्रिका वाटप करीत होता. १ एप्रिल रोजी त्याचे बुलडाणा जिल्ह्यातील जामठी येथील तरुणीशी लग्न होणार होते. बहिणीला पत्रिका देऊन परतत असताना काळाने त्याच्यावर झडप घातली. त्याच्या पश्चात ३ बहिणी, दोन भाऊ, आई-वडील असा परिवार आहे.
शिवना गावावर शोककळा
या दुर्घटनेमुळे शिवना गावावर शोककळा पसरली आहे. नातेवाईक लग्नाची तयारी करीत होते. सुखी संसाराची स्वप्ने पाहणारा राहुल १ एप्रिल रोजी विवाह बंधनात अडकणार होता. त्याआधीच त्याचा मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. शुक्रवारी या तिघांवर शिवना येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अनेक राजकीत नेते, मान्यवरांनी जगताप कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना धीर दिला.