सामूहिक कॉपी करणाऱ्या ३२२ विद्यार्थ्यांवर तीन परीक्षा बंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2019 11:57 PM2019-07-03T23:57:31+5:302019-07-03T23:58:01+5:30
सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या गोंदेगाव (ता.सोयगाव ) येथील शाळेत दहावीच्या परीक्षेत गणिताच्या पेपरला सामूहिक कॉपी केल्याच्या प्रकरणात ३२२ परीक्षार्थ्यांना आगामी तीन परीक्षांसाठी (वन प्लस टू) बंदी घालण्याचा निर्णय शिक्षण मंडळाने घेतला. सामूहिक कॉपी प्रकरणात सहभागी शिक्षकांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना स.भु. संस्थेला दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.
औरंगाबाद : सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या गोंदेगाव (ता.सोयगाव ) येथील शाळेत दहावीच्या परीक्षेत गणिताच्या पेपरला सामूहिक कॉपी केल्याच्या प्रकरणात ३२२ परीक्षार्थ्यांना आगामी तीन परीक्षांसाठी (वन प्लस टू) बंदी घालण्याचा निर्णय शिक्षण मंडळाने घेतला. सामूहिक कॉपी प्रकरणात सहभागी शिक्षकांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना स.भु. संस्थेला दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च महिन्यात घेतलेल्या दहावीच्या परीक्षेत ११ मार्च रोजी गणित भाग-१ विषयाची परीक्षा होती. या परीक्षेत गोंदेगावच्या सरस्वती भुवन हायस्कूल केंद्राला भरारी पथकाने भेट दिली. यावेळी शिक्षक, पर्यवेक्षक आणि केंद्र संचालकच विद्यार्थ्यांना कॉर्बन कॉपीच्या साह्याने कॉपी पुरवीत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. भरारी पथकातील माध्यमिकचे शिक्षणाधिकारी डॉ. बी. बी. चव्हाण, जे. व्ही. चौरे, एम. आर. सोनवणे यांच्या पथकाने केंद्रातील सर्व हस्तलिखित कार्बन कॉपी हस्तगत केली. तसेच इतरही पुरावे गोळा करून गोपनीय अहवाल विभागीय मंडळाला त्याच दिवशी कळविला. मंडळाने तात्काळ केंद्र संचालकांची हकालपट्टी केली होती. कॉपी झालेल्या गणिताच्या उत्तरपत्रिकाही मंडळात मागविल्या. यानंतर चौकशी करण्यासाठी प्राथमिकचे शिक्षणाधिकारी सूरजप्रसाद जैस्वाल यांची समिती स्थापन केली होती. या समितीने प्रत्यक्ष शाळेला भेट देऊन शिक्षकांची हस्ताक्षरे तपासली. या समितीच्या अहवालात शिक्षकांसह विद्यार्थ्यांना दोषी ठरविण्यात आले होते. विद्यार्थ्यांनाही बाजू मांडण्यासाठी बोलावण्यात आले होते. भरारी पथक, प्राथमिक शिक्षणाधिकाºयाचा अहवाल, विद्यार्थ्यांची बाजू आणि तपासलेल्या उत्तरपत्रिकांवर असलेली मास कॉपी पाहून २३ जून रोजी विभागीय मंडळाच्या तदर्थ समिती बैठकीत विद्यार्थ्यांसह शिक्षकांवर कडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला. विद्यार्थ्यांवर चालू वर्षाचा निकाल रद्द करून वन प्लस टू ची कारवाई करण्यात आली. मुख्य आरोपी शिक्षकांवर निलंबनाची आणि इतरांच्या वेतनवाढी रोखण्याच्या सूचना स.भु.संस्थेला दिल्याचे अहवालात नमूद केल्याची माहिती सूत्रांनी दिली. हा अहवाल व कारवाईची माहिती शाळा आणि संस्थेला शनिवारी कळविण्यात येणार असल्याचे समजते.
कोट
सरस्वती भुवन हायस्कूल, गोंदेगाव येथील दहावीच्या परीक्षेत झालेल्या मास कॉपी प्रकरणात मंडळाने नियमानुसार कारवाई केली आहे. नियमबाह्य कोणतेही पाऊल मंडळाने उचलले नाही. कॉपीसारख्या प्रकाराला आळा घालण्यासाठी सर्व बाजू तपासून निर्णय घेतला. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी संबंधितांना शनिवारी पत्र देण्यात येईल.
-शरद गोसावी, अध्यक्ष, विभागीय मंडळ