शाळा सुटल्यावर तीन मित्रांची ओढ्याकडे धाव; पाण्याचा अंदाज न आल्याने झाला बुडून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2022 11:32 AM2022-03-25T11:32:22+5:302022-03-25T11:35:01+5:30
संकणापुरी येथे तीन विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू
आष्टी (जि. जालना) : परतूर तालुक्यातील आष्टीपासून दहा किलोमीटरवर असलेल्या संकणापुरी येथील तीन शालेय विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. २४ मार्च २२ रोजी हे तिघेजण गावाशेजारी ओढ्यात पोहण्यासाठी गेले होते.
या घटनेने संकणापुरी येथे सायंकाळी चूल पेटली नाही. संकणापुरी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या अजय रघुनाथ टेकाळे (वय १३), करण बाळासाहेब नाचण (१०) आणि उमेश बाळासाहेब नाचण (वय १०) यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. महसूल विभागाने पंचनामा केला आहे. सकाळी साडेदहा वाजता शाळा सुटल्यावर हे तिघेजण गावाशेजारील ओढ्यात असलेल्या पाण्यात पोहण्यासाठी गेले होते. त्यांनी त्यांचे दप्तर पाण्याच्या काठावर ठेवल्याने त्यांचा शोध लागला. शाळा सुटल्यावर दोन तास उलटल्यावरही मुले घरी आली नाहीत, याची चौकशी करण्यासाठी पालकांनी शोधाशोध सुरू केली. यावेळी कोणीतरी मुलांची दप्तरे ही ओढ्याजवळ असल्याचे सांगितले.
त्यामुळे ग्रामस्थांनी तेथे गर्दी केली. मोठ्या प्रयत्नाने मुलांचे मृतदेह बाहेर काढले. मृतदेह बाहेर काढल्यावर आई-वडिलांसह अन्य नातेवाईकांनी हंबरडा फोडला. त्यांचे अश्रू आवरतांना गावकरीही शोकमग्न झाले होते. या घटनेची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरली. दुपारी चार वाजेनंतर मृतदेह बाहेर काढल्यावर त्या चिमुकल्यांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी संपूर्ण गावकरी हजर होते. या घटनेने संपूर्ण गावात शोककळा पसरली होती. तेथे रात्री चूलही पेटली नसल्याचे सांगितले. दरम्यान रात्री आठ वाजेच्या सुमारास परतूरच्या तहसीलदार रूपा चित्रक यांनी मृत पावलेल्या कुटुंबातील सदस्यांची भेट घेऊन सांत्वन केले.