गँगरेपमधील तीन संशयितांना २४ तासांत गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 12:09 AM2017-10-10T00:09:00+5:302017-10-10T00:09:00+5:30

घरी सोडण्याच्या निमित्ताने २२ वर्षीय पीडितेचे अपहरण करून तिला मुकुंदवाडी परिसरातील विमानतळ भिंतीलगतच्या एका पडक्या घरात डांबून तिच्यावर सामूहिक अत्याचार करणा-या तीन संशयित नराधमांना गुन्हे शाखेने २४ तासांत बेड्या ठोकल्या

 Three gang-raped criminals were arrested by the crime branch in 24 hours | गँगरेपमधील तीन संशयितांना २४ तासांत गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या

गँगरेपमधील तीन संशयितांना २४ तासांत गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : घरी सोडण्याच्या निमित्ताने २२ वर्षीय पीडितेचे अपहरण करून तिला मुकुंदवाडी परिसरातील विमानतळ भिंतीलगतच्या एका पडक्या घरात डांबून तिच्यावर सामूहिक अत्याचार करणा-या तीन संशयित नराधमांना गुन्हे शाखेने २४ तासांत बेड्या ठोकल्या. या आरोपींनी पीडितेला अमानुष मारहाण केल्याने ती गंभीर जखमी असून, तिच्यावर घाटीत उपचार सुरू आहेत.
सागर सुभाष बुट्टे (२०), उमेश उत्तम डुकळे (२२) आणि अनिल रामचंद्र गायकवाड (२६, सर्व रा.जयभवानीनगर) असे अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. या खळबळजनक घटनेविषयी अधिक माहिती देताना गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त रामेश्वर थोरात यांनी सांगितले की, गारखेडा परिसरातील भारतनगर येथील रहिवासी २२ वर्षीय विवाहिता ५ आॅक्टोबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास स्वराजनगर येथे राहणा-या चुलतीला भेटून मुकुंदवाडी रेल्वेस्टेशनमार्गे घरी जात होती. यावेळी जयभवानीनगर चौकात आरोपी सागर रिक्षाचालक तिला भेटला. तेव्हा त्याच्या रिक्षात आरोपी उमेश आणि अनिल हे बसलेले होते. त्याने रेल्वेस्टेशनला सोडतो, चल असे म्हणून रिक्षात बसविले. यानंतर त्यांनी पीडितेला रेल्वेस्टेशनला न सोडता ते तिला विमानतळ भिंतीलगतच्या रेल्वेगेटकडील एका पडक्या वाड्यात घेऊन गेले. तुम्ही मला इकडे कोठे घेऊन आलात, असे विचारताच आरोपींनी तिला चाकूने भोसकून मारून टाकण्याची धमकी दिली. यावेळी प्रथम सागरने आणि नंतर उमेश व अनिल यांनी तिच्यावर अत्याचार केले. यावेळी तिने आरडाओरड करू नये, म्हणून नराधमांनी तिच्या तोंडाला पट्टी बांधली. घाणेरडे कृत्य केल्यानंतरही त्यांनी तिला सोडून दिले नाही. शुक्रवार आणि शनिवार सलग दोन दिवस डांबून ठेवल्यानंतर या घटनेची कोठेही वाच्यता केल्यास तुला मारून टाकीन अशी धमकी देत त्यांनी तिच्या पायाच्या नळगीवर लोखंडी रॉडने जबर मारहाण केली. शनिवारी रात्री आरोपी तिकडे न फिरकल्याने पीडितेने स्वत:ची सुटका करून घेतली. यानंतर ती घरी गेली. घडलेली सर्व घटना तिने पतीला सांगितली.
रविवारी दुपारी पीडितेने पतीसह मुकुंदवाडी ठाण्यात धाव घेतली.
तेथे तिने नराधमांविरुद्ध फिर्याद नोंदविली.
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त रामेश्वर थोरात, पोलीस निरीक्षक शिवाजी कांबळे, सहायक निरीक्षक घनश्याम सोनवणे, पोहेकॉ संतोष सोनवणे, विजयानंद गवळी, सुधाकर राठोड, सिद्धार्थ थोरात, नंदलाल गवळी, धर्मराज गायकवाड, लालखॉ पठाण, योगेश गुप्ता, हिरा राजपूत यांनी आरोपींचा शोध सुरू केला.
पीडितेने केवळ सागर रिक्षाचालक एवढेच नाव पोलिसांना सांगितले होते. पोलिसांनी खब-यांना कामाला लावून सागर रिक्षाचालकासोबत ५ आॅक्टोबर रोजी आणि नंतर कोण फिरत होते. याबाबतची माहिती मिळविली. तेव्हा सागरसोबत उमेश आणि
अनिल हे दोन रिक्षाचालक होते, असे कळाले. तिन्ही रिक्षाचालकांना मद्याचे व्यसन असून त्यांनीच हे कृत्य केल्याची पक्की माहिती पोलिसांना समजली.
आरोपींची नावे समजताच सागर हा बीड बायपास परिसरातील गुरू लॉन्सच्या मागे असल्याचे खब-याने पथकाला सांगितले. पथकाने सकाळीच प्रथम सागरला आणि नंतर अन्य दोन्ही आरोपींना उचलले. त्यांची ओळखपरेड केली जाणार असल्याचे सहायक आयुक्त थोरात यांनी सांगितले. तपास करणा-या पथकाला पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी २५ हजार रुपये बक्षीस जाहीर केले आहे.
उस्मानपुरा विभागाचे सहायक पोलीस आयुक्त रामेश्वर गायकवाड हे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

Web Title:  Three gang-raped criminals were arrested by the crime branch in 24 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.