जिल्ह्यात तीन तासांचे भारनियमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 12:33 AM2017-09-13T00:33:47+5:302017-09-13T00:33:47+5:30
कोळसा टंचाईमुळे महानिर्मिती कंपनीवर वीज संच बंद ठेवण्याची वेळ आली असून त्यामुळे राज्यभरात भारनियमन करण्यात येत आहे़ नांदेड जिल्ह्यात वीज वसुली कमी आणि वीज गळती अधिक असलेल्या फिडरवर साधारणत: तीन ते पाच तासांचे भारनियमन करण्यात येत आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: कोळसा टंचाईमुळे महानिर्मिती कंपनीवर वीज संच बंद ठेवण्याची वेळ आली असून त्यामुळे राज्यभरात भारनियमन करण्यात येत आहे़ नांदेड जिल्ह्यात वीज वसुली कमी आणि वीज गळती अधिक असलेल्या फिडरवर साधारणत: तीन ते पाच तासांचे भारनियमन करण्यात येत आहे़ भारनियमन करताना वीज वापर अधिक होणाºया वेळेवरच लक्ष केंद्रित करण्यात येत आहे़
नांदेड जिल्ह्यात पावसाने उघडीप दिल्यानंतर उकाड्यात प्रचंड वाढ झाली आहे़ नागरिक घामाघूम होत असताना महावितरणकडून विजेच्या कमी उपलब्धतेमुळे भारनियमन करण्यात येत आहे़ नांदेड शहरातील देगलूर नाका व जुने नांदेड भागातील वीज गळती अधिक आणि वीज वसुली कमी असलेल्या फिडरवर साधारणत: तीन तासांचे भारनियमन करण्यात येत आहे़ तर ग्रामीण भागात सरासरी पाच तासांचे भारनियमन करण्यात येत आहे़ त्यामध्ये ई, एफ, जी, जी-१, जी-२, जी-३ या फिडरवर सर्वाधिक भारनियमन करण्यात येत आहे़ परंतु जिल्ह्यातील नेमक्या किती फिडरवर भारनियमन करण्यात येत आहे याची माहिती तूर्त महावितरणकडे उपलब्ध नाही़
याबाबत महावितरणच्या नांदेड परिमंडळाचे मुख्य अभियंता अविनाश पाटोळे यांनी सांगितले, मुंबई कार्यालयाकडून आलेल्या सूचनेवरुन सध्या ग्रामीण भागात वीजगळती अधिक आणि वसुली कमी असलेल्या फिडरवर साधारणत: ३ ते ५ तासांचे भारनियमन करण्यात येत आहे़ जस-जशी वीज उपलब्ध होईल त्याप्रमाणे भारनियमनाच्या वेळाही कमी करण्यात येणार आहेत़ नांदेड जिल्ह्यात आजघडीला ७९ फिडरवर भारनियमन सुरू असल्याचे पाटोळे यांनी सांगितले़