साडेतीनशे कोटींचा फटका !
By Admin | Published: August 9, 2015 12:24 AM2015-08-09T00:24:59+5:302015-08-09T00:28:10+5:30
उस्मानाबाद : वरूणराजाच्या अवकृपेमुळे खरीप पिके हातची गेली आहेत. त्यामुळे थोडेथोडके नव्हे, तर तब्बल साडेतीनशे कोटींपेक्षा अधिक नुकसान झाले आहे.
उस्मानाबाद : वरूणराजाच्या अवकृपेमुळे खरीप पिके हातची गेली आहेत. त्यामुळे थोडेथोडके नव्हे, तर तब्बल साडेतीनशे कोटींपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. यामध्ये प्रामुख्याने उडीद, मूग आणि सोयाबीनच्या पिकांचे अधिक नुकसान झाले आहे. हा अहवाल कृषी विभागाकडून शासनाला सादर करण्यात आला आहे.
जिल्हाभरात मागील तीन-चार वर्षांपासून सातत्याने अत्यल्प पाऊस होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यास आर्थिक संकटाचा सामना करवा लागत आहे. यंदा तरी चांगला पाऊस होईल, अशी अपेक्षा शेतकरी बाळगून होते. परंतु, घडले उलट. जिल्ह्याच्या काही भागात सुरूवातील पेरणीयोग्य पाऊस झाला. त्यानंतर लागलीच संबंधित भागातील शेतकऱ्यांनी चाढ्यावर मुठ धरली. मोठ्या पावसाच्या भरावशावर ३ लाख ९२ हजारांपैकी तब्बल १ लाख ९५ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली. सदरील पिकांची उगवण झाल्यानंतर पावसाने दडी मारली. त्यानंतर एकही दमदार पाऊस झाला नाही. त्यामुळे खरिपाची पिके जमिनोध्वस्त झाली आहेत. उडीद पिकाची २१ हजार ३७३ हेक्टवर पेरणी झाली होती. प्रति हेक्टरी सरासरी ४४१ एवढी उत्पादकता गृहित धरली असता ९४ हजार २५४.०३ क्टिंवल उत्पादन अपेक्षित होते. त्यास ४ हजार ३५० रूपये हमीभाव गृहित धरल्यास अंदाजे ४ हजार १०० लक्ष रूपयांचे नुकसान झाले असल्याचे अहवालात म्हटले आहे.
हीच स्थिती मूूग या पिकाच्या बाबतीत आहे. १० हजार १२२ हेक्टवर या पिकाची पेरणी करण्यात आली होती. याची सरासरी उत्पादकता ४२९ क्विंटल प्रति हेक्टर एवढी आहे. त्यामुळे उपरोक्त पेऱ्याच्या माध्यमातून ४३ हजार ४२४.३८ क्विंटल उत्पादन मिळाले असतो. त्यास ४ हजार ६०० रूपये एवढा हमीभाव गृहित धरले असता तब्बल १ हजार ९९७.४८ लक्ष रूपयांचा फटका बसला आहे. मागील काही वर्षांपासून सातत्याने सोयाबीनखालील क्षेत्रात झपाट्याने वाढ होत आहे. यंदाही शेतकऱ्यांनी याच पिकाला अधिक प्राधान्य दिल्याचे दिसून येते. ८९ हजार ११६ हेक्टवर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली होती. प्रतिहेक्टरी सरासरी १२८६ किलो एवढी उत्पादकता आहे. परंतु, अत्यल्प पावसामुळे शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर पाणी फेरले गेले. बहुतांश ठिकाणचे सोयाबीन करपून गेले आहे. वेळेवर पाऊस पडला असता तर २९ हजार ३३८ लाख रूपये एवढे उत्पन्न मिळाले असते, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे. सदरील नुकसानीचा अहावाल नुकताच शासनाला सादर करण्यात आला आहे. एकूण नुकसानीचा अंदाजे आकडा ाहा ३५ हजार ४३५.९८ लक्ष रूपये (३५४ कोटी) एवढा मोठा आहे. (प्रतिनिधी)
जिल्हाभरात मिळून १० हजार १२२ हेक्टवर मूग, २१ हजार ३७३ हेक्टवर उडीद, ८९ हजार ११६ हेक्टवर सोयाबीन आणि २६ हजार ३०० हेक्टवर इतर पिकांची पेरणी करण्यात आली होती. परंतु, ही सर्व पिके वाया गेल्यात जमा आहेत. त्यामुळे पेरणी न झालेले आणि पिके वाया गेलेल्या १ लाख ४६ हजार ९९१ हेक्टवर क्षेत्रावर दुबार पेरणी करणे शक्य नाही, असे कृषी विभागाकडून सादर केलेल्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील एकूण ४२ महसूल मंडळापैकी १७ मंडळामध्ये ७५ मिमी पेक्षा कमी पाऊस झाला आहे. ८ मंडळांमध्ये ७५ ते १०० मिमी दरम्यान पाऊस पडला आहे. ११ मंडळामध्ये १०० ते १२५ मिमी, तीन मंडळामध्ये १२५ ते १५० मिमी आणि उर्वरित तीन मंडळामध्ये १५० मिमी एवढा पाऊस झाला आहे. या अत्यल्प स्वरूपाच्या पावसामुळेच खरीप पिके वाया गेली आहेत.
जिल्ह्यातील ७३७ पैकी उस्मानाबाद तालुक्यातील ५०, तुळजापूर तालुक्यातील २०, परंडा तालुक्यातील ९, भूम तालुक्यातील ११ अशा एकूण ९० गावांमध्ये पेरणीच झालेली नसल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे.