शस्त्रधारी टोळक्यांची गुंडगिरी; प्राणघातक हल्ल्याच्या २४ तासांत तीन घटनांनी शहर हादरले
By सुमित डोळे | Published: July 7, 2023 12:16 PM2023-07-07T12:16:11+5:302023-07-07T12:17:28+5:30
बारमध्ये दारू दिली नाही, गाडीचा कट लागला, जुन्या भांडणातून टाेळक्यांकडून वार
छत्रपती संभाजीनगर : शहर व शहरालगत परिसरात सध्या शस्त्रास्त्रे घेत फिरणारे वाढले आहेत. किरकोळ कारणांवरून कोणीही गुंडगिरीवर उतरत असून, थेट शस्त्रांनीच प्राणघातक हल्ला केल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. पोलिस सातत्याने नाकाबंदी करत असताना देखील गुन्हेगारी मात्र कमी होत नसल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना आहे. विशेष म्हणजे, यातील दोन घटनांत रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याने पोलिसांचा वचक संपत चालला आहे का, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
पहिली घटना: पूर्वी बाटल्यांनी डोके फोडले, आता चाकू खुपसला
पूर्वी बारमध्ये एकमेकांच्या डोक्यात बीअरच्या बाटल्या फोडलेल्या आरोपी ४ जुलै रोजी रा़त्री ११ वाजता एन-७च्या आयोध्यानगर उद्यानात पुन्हा समोरासमोर आले. कुख्यात गुन्हेगार चंद्रदीप उर्फ भावड्या अंभोरे याने साथीदार शुभम भिवसने, पीयूष इंगळे, विक्की इंगळे यांच्यासह किरण त्र्यंबक सूरडकर (२८, रा. आयोध्यानगर) याला रस्त्यात अडवले. तू जास्त माजला आहे, असे म्हणत त्यांनी मोठा धारधार चाकू त्याच्या पोटात खुपसला. स्थानिकांनी हा प्रकार पाहताच किरणच्या मित्रांनी धाव घेत त्याला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल केले. चंद्रदीपवर यापूर्वी सात गंभीर गुन्हे दाखल आहेत.
दुसरी घटना: दारू देण्यास नकार, चार वेटरवर हल्ला
चोरी, भांडण, जुगार, खून असे गुन्हे दाखल असलेला गुंड अय्यूब अली उर्फ बाली महेबू शेख (४५), त्याचा मोठा मुलगा फैजानने टोळीसह बुधवारी रात्री साडेअकरा वाजता जालना रस्त्यावरील पंचम बारमध्ये शस्त्रांसह प्रवेश केला. कर्मचारी नितीन कांबळे यांनी त्यांना बार बंद झाल्याचे सांगितले. मात्र, अय्यूब व इतरांनी जोरजोरात टेबल वाजवणे सुरू केले. त्यानंतर ‘पहचानता नहीं क्या, मै यहा का दादा हुँ, हमे दारू दे’ असे म्हणत कंबरेला लावलेला चाकू काढून कर्मचारी संकेत जगताप याच्या डोक्यात व छातीत खुपसला. यात संकेतची प्रकृती गुरुवारी रात्रीपर्यंत गंभीर होती. घटनेनंतर निरीक्षक अशोक भंडारी यांनी तत्काळ अय्यूब, फैजान, नदीम वसीम शेख (२४), शेख अरबाज शेख इद्रिस शेख, मोहम्मद बशीर शाहीद खान यांना अटक केली. न्यायालयाने त्यांना ८ जुलैपर्यंत पाेलिस कोठडी सुनावली.
तिसरी घटना: केवळ हूल दिली म्हणून चाकू, गजाने भोसकले
वाढदिवस साजरा करून परतताना चौघांना सहा जणांनी चाकू, गजाने भोसकल्याची घटना ५ जुलैला रात्री सोलापूर- धुळे महामार्गावर घडली. रत्नाकर हिवाळे (रा. देवळाई) हे मित्रांसह स्काॅर्पिओतून वाढदिवस साजरा करून साडेअकरा वाजता शहरात येत असताना त्यांना एकाने हूल दिली. एस क्रॉस गाडीचालकाने हिवाळे यांच्या गाडीसमोर गाडी आणल्याने हिवाळे यांनी ब्रेक लावत त्याला विचारणा केली. एस क्रॉसमध्ये निपाणीचा मनोज भालेकर, मुकुंद भालेकर, विकास घोडके, रामेश्वर गवारे व अन्य एक जण होता. तेथेच हिवाळे व त्यांच्यात वाद झाला. तेथे इतरांनी वाद मिटवलादेखील. परंतु भालेकर व इतरांनी त्यांचा पाठलाग करून पुन्हा निपाणी शिवारात चौधरी हॉटेलसमोर त्यांना थांबवून हिवाळे यांच्यावर हल्ला चढवला. यात रामचंद्र नारायण हिवाळे व सागर गायके, संतोष हरिभाऊ हिवाळे, वैभव रत्नाकर हिवाळे, अशोक गायके, दत्ता खैरे जखमी झाले. यातील काहींची प्रकृती गुरुवारी रात्रीपर्यंत गंभीर होती. भालेकर वर यापूर्वीदेखील गंभीर गुन्हा दाखल असल्याचे चिकलठाणा पोलिस ठाण्याचे निरीक्षक रवींद्र खांडेकर यांनी सांगितले.