रस्ता ओलांडताना दोन भावांसह तिघांना ट्रकने उडवले, दोन ठार, एक जखमी
By राम शिनगारे | Published: June 18, 2023 09:07 PM2023-06-18T21:07:22+5:302023-06-18T21:07:30+5:30
धुळे सोलापुर महामार्गावरील घटना घटना : वरिष्ठ अधिकाऱ्यांची घटनास्थळी धाव
छत्रपती संभाजीनगर : धुळे-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर रस्ता ओलांडत असताना तीन जणांना भरधाव वेगातील ट्रकने उडवले. त्यात दोनजण जागीच ठार झाले तर एकजण गंभीर जखमी झाला. ही घटना आडगाव येथील पुलाजवळ रविवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. दरम्यान, तीन जणांना उडविणारा ट्रकचालक फरार झाला आहे. या घटनेची चिकलठाणा ठाण्यात नोंद करण्यात आली.
पिन्टोसिंग प्रल्हादसिंग राजपुत (२२, रा. भिलवाडा, राज्यस्थान), गजानन देवराव मोहिते (४५, रा. हासनाबाद, ता. भोकरदन, जि. जालना) यांचा मृतामध्ये समावेश आहे. कमलेशसिंग प्रल्हादसिंग राजपुत (२७, रा. भिलवाडा,राज्यस्थान) हे गंभीर जखमी झाल्याची माहिती चिकलठाणा पोलिसांनी दिली. आडगाव परिसरातील धुळे-सोलापुर राष्ट्रीय महामार्ग ओलांडत असताना बीडच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकने तीन जणांना उडवले.
त्यात पिन्टोसिंग व गजानन हे जागीच ठार झाले. तर पिन्टोसिंगचा भाऊ कमलेशसिंग हा गंभीर जखमी झाला आहे. हे सर्वजण आडगाव परिसरात एका ठेकेदाराकडे कामाला होते. अपघातानंतर जखमीला खाजगी रुग्णालयात दाखल केले. या घटनेनंतर ट्रक चालक जखमींना सोडून पळून गेला. या घटनेची माहिती समजताच विभागीय पोलिस अधिकारी जयदत्त भवर, पोलिस निरीक्षक रविंद्र खांडेकर, उपनिरीक्षक योगेश खटाणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही मृतदेह घाटीत नेण्यात आले. त्याठिकाणी दोघांवर रात्री उशिरा शवविच्छेदन करण्यात आले. या प्रकरणी चिकलठाणा पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली. अधिक तपास उपनिरीक्षक खटाणे करीत आहेत.