टी.व्ही. स्फोटात तीन जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 01:03 AM2017-09-23T01:03:22+5:302017-09-23T01:03:22+5:30
टी.व्ही.समोर बसून कार्यक्रम पाहणे एकाच कुटुंबातील तीन जणांना चांगलेच महागात पडले. टी.व्ही.चा अचानक स्फोट झाल्याने त्यांना किरकोळ जखमा झाल्या
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : टी.व्ही.समोर बसून कार्यक्रम पाहणे एकाच कुटुंबातील तीन जणांना चांगलेच महागात पडले. टी.व्ही.चा अचानक स्फोट झाल्याने त्यांना किरकोळ जखमा झाल्या. ही घटना मुकुंदवाडीतील इंदिरानगर येथे गुरुवारी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली.
शिवाजी नारायण लंके (वय ५६), सुमन शिवाजी लंके (४५) आणि रमेश शिवाजी लंके (२७) अशी जखमींची नावे आहेत. याविषयी प्राप्त माहिती अशी की, मुकुंदवाडी परिसरातील अनेक घरांना गुरुवारी सकाळपासून कमी-जास्त दाबाने वीजपुरवठा सुरू होता. याबाबत रहिवाशांनी महावितरणच्या स्थानिक कार्यालयाकडे फोन करून तक्रार केली होती. मात्र, वीजपुरवठ्याच्या गुणवत्तेत सुधारणा झाली नव्हती. दरम्यान, गुरुवारी रात्री लंके कुटुंब घरातील टी.व्ही.वर प्रोगाम पाहत बसले होते. यावेळी अचानक टी.व्ही.तून स्फोटासारखा आवाज झाला आणि टी.व्ही.ची पिक्चर ट्यूब फुटून उडाली. यावेळी टी.व्ही.समोर असलेल्या शिवाजी, सुमन आणि रमेश यांना पिक्चर ट्यूबच्या काचा आणि गरम प्लास्टिक उडून लागले. यात तिघांनाही किरकोळ जखमा झाल्या. एका जणाच्या डोक्याला तर दुसºयाच्या पायाला जखम झाली आणि सुमन यांनाही भाजले. या घटनेनंतर त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात प्रथमोपचार करण्यात आले. पोलिसांत मात्र या घटनेची नोंद करण्यात आलेली नाही. पोलिसांनी या घटनेचा दुजोरा दिला नाही.