आंतरराज्यीय तीन गुन्हेगार जाळ्यात
By Admin | Published: June 25, 2014 01:20 AM2014-06-25T01:20:58+5:302014-06-25T01:28:47+5:30
औरंगाबाद/ वाळूज महानगर : वाळूज औद्योगिक परिसरातील मण्णपूरम बँकेवर दरोडा घालण्याचा अयशस्वी प्रयत्न करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला गुन्हे शाखेच्या पथकांनी अटक केली.
औरंगाबाद/ वाळूज महानगर : वाळूज औद्योगिक परिसरातील मण्णपूरम बँकेवर दरोडा घालण्याचा अयशस्वी प्रयत्न करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला गुन्हे शाखेच्या पथकांनी अटक केली. या टोळीकडून वाळूज परिसरातील अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांनी व्यक्त केली आहे.
सोपान ओपीन पिंपळे, बाळा यमगर पिंपळे, बाळ्या महादेव सोळंकी या तीन दरोडेखोरांना अटक करण्यात आली असून, कान्या ऊर्फ करण सोळंकी याला ताब्यात घेतले आहे. त्याची कसून चौकशी सुरू असून, त्यालाही रात्रीच अटक केली जाईल, असे निरीक्षक आघाव यांनी सांगितले. सोमवारी पहाटे वाळूज औद्योगिक वसाहतीतील मण्णपूरम बँकेसह परिसरातील ६ दुकाने या टोळीने फोडली होती. २४ तासांच्या आत दरोडेखोरांची टोळी गजाआड करण्यात गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले. पोलीस आयुक्त राजेंद्र सिंह यांनी या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांच्याकडे सोपविला. त्यानुसार आघाव यांनी स्वत:बरोबर निरीक्षक गौतम पातारे, शिवा ठाकरे, सहायक निरीक्षक उन्मेष थिटे, उपनिरीक्षक अजयकुमार पांडे, सुभाष खंडागळे यांची पथके दरोडेखोरांच्या मागावर लावली. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेज तपासल्यानंतर दरोडेखोरांच्या तपासाची दिशा ठरविली. या दरोडेखोरांनी मध्यप्रदेश येथील काही अट्टल गुन्हेगारांना औरंगाबादेत बोलावून घेतले होते. कालच्या गुन्ह्यात त्यांचा समावेश होता. आणखी ६ दरोडेखोरांच्या मागावर गुन्हे शाखेचे पोलीस आहेत.
दरोडेखोरांनी कामगार चौकातून २ लाखांचे स्पेअर पार्ट, तर पंढरपुरात २० हजारांची रोकड पळविली. दरोडेखोरांनी दोन सुरक्षारक्षकांना बेदम मारहाण करून ६ दुकानेही फोडली होती. सोने तारण ठेवणाऱ्या मण्णपूरम बँकेची तिजोरी फोडण्यास दरोडेखोरांना अपयश आल्यामुळे तब्बल दोन कोटी रुपयांचे सोने लुटण्याचा प्रयत्न फसला होता. या घटनेनंतर वाळूज औद्योगिक परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सुरुवातीला पाच संशयित आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेतले. संशयितांची आज दिवसभर कसून चौकशी करण्यात आली.
पोलिसांचा अजब तपास
दरोडेखोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून, दरोडेखोरांचे फुटेज ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले.
या फुटेज (फोटो) मुळेच दरोडेखोर फरार झाल्याचा अजब जावई शोध एमआयडीसी वाळूज पोलिसांनी लावला आहे. दरोडाप्रकरणी प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींना अधिक माहिती सांगण्यास पोलिसांनी टाळाटाळ केली.