घाटीच्या पायऱ्यावरील ‘त्या’ मृत्यू प्रकरणाची ३ सदस्यीय समितीकडून होणार चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:04 AM2021-03-18T04:04:21+5:302021-03-18T04:04:21+5:30
औरंगाबाद : घाटीतील अपघात विभागासमोर पायऱ्यावर तासन्तास पडून असलेल्या एका जखमीचा वेळीच उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी ...
औरंगाबाद : घाटीतील अपघात विभागासमोर पायऱ्यावर तासन्तास पडून असलेल्या एका जखमीचा वेळीच उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली. या घटनेविषयी बुधवारी सर्व स्तरातून एकच संताप व्यक्त करण्यात आला. या घटनेची गांभीर्याने दखल घेत घाटी प्रशासनाने ३ सदस्यीय समिती नेमून चौकशी सुरू केली आहे.
पायाला जखम झालेली आणि त्या जखमेला मुंग्या लागलेल्या, माशा घोंगावत होत्या, अशा अवस्थेत ती व्यक्ती घाटीतील अपघात विभागाच्या पायऱ्यांवर वेदनेने विव्हळत पडून होती. काहींनी अपघात विभागातील डाॅक्टरांना माहिती दिली. मात्र, वेळीच कोणीही त्यांच्याकडे धावले नाही. शेवटी पडल्या जागेवरच त्याने अखेरचा श्वास घेतला. मृत्यू झाल्यानंतर त्याला अपघात विभागात दाखल करण्यासाठी यंत्रणेने धावपळ केली. या प्रकाराविषयी ‘लोकमत’ने १७ मार्च रोजी ‘जखमेला मुंग्या...त्याने घाटीच्या पायऱ्यावर सोडला श्वास’ या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रकाशित केले. सामाजिक संस्थांनी या घटनेविषयी तीव्र संताप व्यक्त केला.
याप्रकरणी चौकशी समिती नेमण्यात आली असून, दोन दिवसांत अहवाल प्राप्त होईल, असे प्रभारी अधिष्ठाता डॉ. वर्षा रोटे यांनी सांगितले. संबंधित व्यक्ती जेव्हा जखमी अवस्थेत पडून होती, त्यावेळी कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात येत आहे. याप्रकरणी आता कोणावर कारवाई होते, याकडे लक्ष लागले आहे.
पोलीस आयुक्तांना निवेदन
अनोळखी व्यक्तीच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या संबंधित जबाबदार अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (ए) नागराज गायकवाड यांनी एका निवेदनाद्वारे पोलीस आयुक्तांकडे केली आहे.
फोटो ओळ....
अपघात विभागासमोर ज्या ठिकाणी त्या व्यक्तीने अखेरचा श्वास सोडला, त्या ठिकाणी बुधवारी अशाप्रकारे स्ट्रेचर ठेवण्यात आले होते.