धनादेश अनादरीत झाल्याने तीन महिने कारावास, ६ लाख ७० हजारांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:05 AM2021-02-24T04:05:52+5:302021-02-24T04:05:52+5:30
वैजापूर : उसने घेतलेल्या रकमेच्या परतफेडीसाठी दिलेले धनादेश अनादरीत झाल्यामुळे आरोपीस तीन महिने कारावास व सहा लाख ...
वैजापूर : उसने घेतलेल्या रकमेच्या परतफेडीसाठी दिलेले धनादेश अनादरीत झाल्यामुळे आरोपीस तीन महिने कारावास व सहा लाख ७० हजार रुपयाच्या दंडाची शिक्षा येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. आर. शिंदे यांनी (दि.२३) सुनावली. सदरील दंडाची रक्कम फिर्यादीस देण्याचे तसेच कसूर केल्यास अतिरिक्त २ महिने करावासाचीही शिक्षा यावेळी सुनावण्यात आली. नितीन विश्वासराव देशमुख (रा. शास्त्रीनगर) असे या प्रकरणात शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
फिर्यादी दर्शन विजयसी रामैय्या (रा. टिळक रोड) यांचे प्रकरणातील आरोपी नितीन देशमुख याच्याशी मैत्रीचे संबंध आहेत. त्यांनी ३१ जानेवारी २०११ रोजी त्याला व्यवसायासाठी तीन लाख ३५ हजार रुपये हातउसने दिले होते. कर्जाची फाईल मंजूर होण्यासाठी ५ ते ६ महिने लागतील असे सांगून आरोपी नितीन देशमुख याने दर्शन रामैया यांंचेकडून ही रक्कम घेतली. दरम्यान, सहा महिन्यांत ही रक्कम आपण परत करू, अशी हमी नितीन देशमुख याने त्यावेळी दिली. मात्र, सहा महिने उलटल्यानंतरही त्याने घेतलेली रक्कम परत न केल्यामुळे दर्शन यांंनी त्यांच्याकडे रकमेची मागणी केली. मात्र, ही रक्कम फेडणे शक्य झाली नाही. अखेर नितीन देशमुख याने २६ फेब्रुवारी २०१३ ला औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. शाखा शिऊर चा एक लाख ७५ रुपयांचा धनादेश दिला. व उर्वरीत रकमेसाठी २० मार्च २०१३ रोजी औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. शाखा शिऊर चा एक लाख ६० हजार रुपयांचा धनादेश दिला. दर्शन यांंनी सदरचे दोन्ही धनादेश बँकेत वटविण्यासाठी टाकले; परंतु पुरेशा रकमेअभावी दोन्ही धनादेश न वटता अनादरीत होऊन परत आले. न्यायालयाने प्रकरणातील सबळ साक्षी-पुरावे व दोन्ही पक्षांच्या वकिलांचा युक्तिवाद लक्षात घेऊन वरीलप्रमाणे शिक्षा सुनावली. फिर्यादीतर्फे ॲड. एस. एस. ठोळे व ॲड. आकाश ठोळे यांनी कामकाज पाहिले.