डेंग्यूचे आणखी तीन संशयित रुग्ण रुग्णालयात दाखल...!
By Admin | Published: August 25, 2016 12:42 AM2016-08-25T00:42:55+5:302016-08-25T00:54:56+5:30
जालना : डेग्यूच्या तापेने बदनापूर तालुक्यातील मांडवा येथील सतरा वर्षीय अर्चना बबन चंद आणि सेवली येथील अकरा वर्षीय शारदा बबन बोरूडे या दोघींचा डेग्यू तापेने मृत्यू झाला होता.
जालना : डेग्यूच्या तापेने बदनापूर तालुक्यातील मांडवा येथील सतरा वर्षीय अर्चना बबन चंद आणि सेवली येथील अकरा वर्षीय शारदा बबन बोरूडे या दोघींचा डेग्यू तापेने मृत्यू झाला होता. त्यातच बुधवारी आणखी तीन संशयित रुग्ण आढळून आले असून जाफराबाद तालुक्यातील अकोला देव, घनसावंगी तालुक्यातील मूर्ती आणि जालना तालुक्यातील काकडा येथील तिघांचा समावेश आहे. त्यांच्यावर जालना शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्य अधिकारी अमोल गिते यांनी दिली.
दीड महिन्यात जिल्ह्यात तापेचे अनेक रुग्ण आढळून आले आहेत. पैकी पाच जणांना डेंग्यू लागण होऊन दोघींना जीव गमवावा लागला आहे. तर तिघांची प्रकृती गंभीर असतानाच बुधवारी आणखी तीन संशयित रुग्ण आढळून आले आहेत. या घटनेने खडबडून जागे झालेल्या आरोग्य विभागाने खबरदारी म्हणून पथक स्थापन केले. या पथकाने मंगळवारी आणि बुधवारी दोन दिवस मांडवा आणि भोकरदन तालुक्यातील पारध येथे गावाला भेटी देवून गावातील तापेने ग्रस्त असलेल्या रुग्णांच्या रक्ताचे नमुने संकलित केले. हे नमुने औरंगाबाद येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
जालना तालुक्यातील सेवली, बदनापूर तालुक्यातील मांडवा आणि अंबड तालुक्यातील एकनाथनगर भोकरदन तालुक्यातील पारध आदी ठिकाणी तापेचे रुग्ण आढळून येत आहे. वातावरणात झालेला बदल आणि गेल्या वीस दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने साचलेल्या पाण्याच्या डबक्यात डासांचे प्रमाण झपाट्याने वाढत असल्याने डासांचे प्रमाण वाढले आहे. परिणामी तापेच्या रुग्णाची वाढ होत असल्याचे आरोग्य विभागाचे मलेरीया अधिकारी श्याम गावंडे म्हणाले. त्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने गावात डास होऊ नयेत म्हणून जनजागृती करण्यात येत आहे. तसेच ग्रामपंचायतीच्या मदतीने गावातील औषधीची फवारणी ,गावात धुरफवारणी केली जात आहे.