मोकाट कुत्रे पकडण्यासाठी तीन संस्थांची तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 05:56 PM2018-12-15T17:56:47+5:302018-12-15T17:57:03+5:30
प्रशासनाने मागविलेल्या निविदांना प्रतिसाद देत तीन संस्थांनी कुत्रे पकडण्याची तयारी दर्शविली आहे. सोमवारी प्रशासनाकडून प्राप्त निविदा उघडून एक निविदा मंजूर करण्यात येणार आहे.
वाळूज महानगर : कुत्र्याच्या वाढत्या उपद्रवामुळे सिडको प्रशासनाने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशासनाने मागविलेल्या निविदांना प्रतिसाद देत तीन संस्थांनी कुत्रे पकडण्याची तयारी दर्शविली आहे. सोमवारी प्रशासनाकडून प्राप्त निविदा उघडून एक निविदा मंजूर करण्यात येणार आहे.
सिडको वाळूज महानगरात दिवसेंदिवस मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढत आहे. दिवसभर नागरी वसाहतीत फिरणारे कुत्रे रात्रीच्या वेळी मुख्य रस्त्यावर घोळक्याने ठाण मांडत आहेत. नागरिकांना चावा घेण्यासाठी धावून जात असून, वाहनधारकांचा पाठलाग करीत आहेत. साईनगर, देवगिरीनगर, सीतानगर भागातील अनेक लहान मुलांसह नागरिकांचे कुत्र्यांनी लचके तोडल्याच्या घटना घडल्या आहेत. शिवाय अपघातासही कारणीभूत ठरत आहेत. त्यामुळे संपूर्ण सिडको वाळूज महानगरासह परिसरात मोकाट कुत्र्याची दशहत पसरली आहे. मोकाट कुत्र्यांचा उपद्रव अधिक वाढल्याने सिडको प्रशासनाने कुत्र्यांचा कायमस्वरुपी बंदोबस्त करण्याचा निर्णय घेतला आहे.
याच अनुषंगाने प्रशासनाने २२ नोव्हेंबर रोजी कुत्रे पकडून निर्बिजीकरण करण्यासाठी निविदा काढून ३ डिसेंबर पर्यंत इच्छुकांकडून अर्ज मागविले होते. दिलेल्या मुदतीत कमी अर्ज आल्याने प्रशासनाने पुन्हा ११ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ दिली. या मुदतीत बीड, अंबरनाथ व डोंबिवली येथील एकूण तीन संस्थांनी प्रशासनाकडे अर्ज केले आहेत. यात कुत्रे पकडून त्यांच्यावर निर्बिजीकरण शस्त्रक्रिया करुन खाज प्रतिबंधक इंजेक्शन दिले जाणार आहे. तसेच अँटीरेबिज लस देवून एडब्ल्युबीआय नियमानुसार त्यांच्यावर उपचार केले जाणार आहेत.
सोमवारी निर्णय घेणार
सिडकोने कुत्रे पकडून निर्बिजीकरण करण्यासाठी काढलेल्या निविदेला प्रतिसाद देत तीन संस्थांनी अर्ज केले आहेत. बीड जिल्हा केज येथील युनिव्हर्सल अॅनिमल वेलफेअर सो., मुंबई डोंबिवली येथील पार्थ प्रतिष्ठाण व अंबरनाथ येथील अॅनिमल वेलफेअर सो. या तीन संस्थांनी सिडको प्रशासनाकडे कुत्रे पकडण्याची तयारी दर्शविली आहे. सोमवारी निविदा उघडून एकाची निवड केली जाणार असल्याची माहिती सिडकोचे मालमत्ता अधिकारी गजानन साटोटे यांनी दिली आहे.
----------------------------------------