सीईटी परीक्षेसाठी आलेल्या बिहारी शिक्षकाला लुटणारे त्रिकूट अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2019 11:06 PM2019-07-07T23:06:47+5:302019-07-07T23:06:56+5:30
बिहारच्या शिक्षकाला बाळापूर फाटा येथे अंधारात नेऊन मारहाण करून लुटणाऱ्या रिक्षाचालकासह त्याच्या साथीदाराला मुकुंदवाडी पोलिसांनी अटक केली.
औरंगाबाद : सीईटी परीक्षा देण्यासाठी औरंगाबादेत आलेल्या बिहारच्या शिक्षकाला बाळापूर फाटा येथे अंधारात नेऊन मारहाण करून लुटणाऱ्या रिक्षाचालकासह त्याच्या साथीदाराला मुकुंदवाडी पोलिसांनी अटक केली. ही लुटमार ६ जुलै रोजी रात्री घडली.
रिक्षाचालक विशाल बाळासाहेब जाधव (२१), अनिकेत रावसाहेब हिवाळे (२२, रा. लोकशाही कॉलनी) आणि सतीश रमेश नाथभजन (२३, रा. मुकुंदनगर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांनी सांगितले की, मनीषकुमार सियाराम प्रसाद (२९, रा. शादीपूर, ता. वंशी, जि. अरवल, बिहार) हे शिक्षक असून, त्यांना सीईटी परीक्षेचे केंद्र औरंगाबादेतील बीड बायपासवरील एका शाळेत मिळाले होते.
७ जुलै रोजी त्यांची परीक्षा असल्याने ६ जुलै रोजी ते शहरात आले होते. सिडको बसस्थानक येथून ते मुकुंदवाडी येथे रिक्षाने गेले. तेथील लॉज त्यांना पसंत न पडल्याने ते शिवाजीनगर येथे लॉजकडे जाण्यासाठी रिक्षात बसले. यावेळी रिक्षात आधीच दोन प्रवासी होते. चालकाने मनीषकुमार यांना थेट शिवाजीनगरला न नेता बाळापूर फाट्याकडे नेले.
तेथे अंधारात रिक्षा उभी केल्यानंतर सहप्रवासी म्हणून बसलेल्या आरोपींनी अचानक मारहाण करण्यास सुरुवात केली. रिक्षाचालकाने त्यांना साथ देत मनीषकुमार यांच्या खिशातील रोख तीन हजार रुपये, गळ्यातील चांदीची चेन, सोन्याची अंगठी आणि मोबाईल असा ऐवज हिसकावून घेतला. या घटनेनंतर मनीषकुमार यांनी मुकुंदवाडी ठाण्यात रविवारी सकाळी तक्रार दाखल केली.
तक्रार प्राप्त होताच पोलीस निरीक्षक माळाळे यांच्या मार्गदर्शनाखाली, उपनिरीक्षक राहुल बांगर, कर्मचारी कैलास काकड, विजय चौधरी, प्रकाश सोनवणे, सोमकांत भालेराव, सुनील पवार यांनी झटपट कारवाई करीत संशयित आरोपींना पकडले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली देत मनीषकुमार यांची लुटलेली चांदीची चेन, मोबाईल, बॅग असा ऐवज काढून दिला.