देवदर्शन करून येताना दुचाकीवरील नियंत्रण सुटले अन् तीन मित्रांनी प्राण गमावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 23:30 IST2025-03-25T23:28:58+5:302025-03-25T23:30:03+5:30
एकाच चितेवर तिघांना दिला अग्निडाग; पिंप्री गावावर दुःखाचा डोंगर कोसळला

देवदर्शन करून येताना दुचाकीवरील नियंत्रण सुटले अन् तीन मित्रांनी प्राण गमावले
- श्यामकुमार पुरे
सिल्लोड: सैलानी बाबांच्या दर्शनासाठी गेलेल्या तिघा मित्रांचा एका वाहनाला ओव्हरटेक करताना नियंत्रण सुटल्याने दुचाकी झाडावर आदळून झालेल्या अपघातात जागीच मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी दुपारी २.३० वाजता चिखली ते जाफ्राबाद रोडवर झाला.
अपघातात ठार झालेले तिघेही तरुण सिल्लोड तालुक्यातील पिंप्री येथील राहणारे आहेत. रोहित महादू चाबूकस्वार ( वय १८ वर्ष रा.पिंप्री ता सिल्लोड ), शुभम रमेश चाबूकस्वार (वय १५ वर्ष रा.पिंप्री ), सोनू सुपडू उसरे (वय २१ वर्षे रा.नाशिक ) अशी अपघातात ठार झालेल्या तरुणांची नावे आहेत. एम एच १५, ०७५७ क्रमांकाच्या पल्सर वाहनाने तिघे तरुण कुंभारी येथे जात होते.काळाने त्यांचा घात केला.
नाशिक येथील सोनू उसरे हा पिप्री येथे नातेवाईकाकडे भेटायला आला होता. चिखली जवळ सैलानीची यात्रा असल्याने सोनू हा गावातील राहुल आणि शुभम हे तिघे मोटार सायकलवर मंगळवारी सकाळी १०.३० वाजता पिप्री येथून निघाले होते. त्यांनी दुपारी सैलानी बाबांचे दर्शन केले व ते सोनू उसरे याचे पाहुणे असलेले भोकरवाडी जवळील कुंभारी येथे जात होते. दरम्यान, एका वाहनाला ओव्हरटेक करतांना समोरून दुसरे वाहन आल्याने नियंत्रण सुटून दुचाकी एका झाडावर जाऊन आदळली. यात तिघांचाही मृत्यू झाला. सोनू हा दुचाकी चालवत होता तर राहुल व शुभम त्याच्या मागे बसले होते. रोहित व शुभम हे चुलते पुतणे आहेत. एकाच कुटुंबातील दोघे व त्यांचा मित्र अपघातात ठार झाल्याने पिंप्री गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
एकाच चितेवर तिघांना अग्नीडाग
अपघातात ठार झालेल्या शुभम, सोनू, आणि रोहित यांचे पार्थिव सिल्लोड तालुक्यातील पिंप्री येथे आणण्यात आले. मंगळवारी रात्री ९.३० वाजता गावातील स्मशानभूमीत एकाच चितेवर तिघांना अग्नीडाग देण्यात आला.
शुभमने १० वीची तर राहुलने १२ वीची दिली परीक्षा
शुभमने एसएससी बोर्डाची दहावीची परीक्षा दिली आहे. त्याच्या परीक्षेचा निकाल लागण्यापूर्वी त्याच्या आयुष्याचा निकाल लागला.त्याच्या मागे आई वडील एक बहीण असा परिवार आहे. तर राहुलने बारावीची परीक्षा दिली आहे.त्याचा ही परीक्षेचा निकाल लागण्यापूर्वी अपघातात मृत्यू झाला.त्याच्या मागे आई , वडील, एक भाऊ, एक बहीण असा परिवार आहे.