बर्ड फ्ल्यूची धास्ती ! शेंद्रा एमआयडीसी परिसरात तीन पारवे पक्षांचा अज्ञात कारणाने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2021 01:30 PM2021-02-02T13:30:40+5:302021-02-02T13:30:57+5:30
Bird Flu शेंद्रा पंचतारांकीत औद्योगिक वसाहतीतील 'ए' सेक्टरमध्ये आढळून आले मृत पक्षी
करमाड : शेंद्रा पंचतारांकीत औद्योगिक वसाहतीतील 'ए' सेक्टरमधील मोकळ्या जागेवरील कचर्याच्या ढिगार्यावर सोमवारी (ता.एक) सकाळी तीन पारवे पक्षी मृत अवस्थेत आढळून आले. सकाळी माॅर्नींग वाॅकसाठी आलेल्या व्यक्तींना नजरेत हे आले.
नेहमीप्रमाणे माॅर्नींग वाॅकसाठी औद्योगिक वसाहतीत रमेश कचकुरे, नारायण मुळे, जयराम कुटे, अशोक मिसाळ, सागर शेजवळ व इंदल पोटोळे हे सोमवारी 'ए' सेक्टरमध्ये आले होते. यावेळी त्यांना या भागातील मोकळ्या जागेवरील कचर्याच्या ढिगार्याजवळ विविध पक्षी मोठया प्रमाणात एकत्रित येऊन एकच आवाज करतांना दिसले. याप्रसंगी हे पक्षी मोठ-मोठ्याने ओरडत होते. एखादा सरपटणारा प्राणी असेल म्हणून ते सर्वजण तिकडे गेले असता त्यांना एकाच जागेवर तीन पारवे मृत अवस्थेत आढळले. त्यामुळे हा मृत्यू बर्ड फ्लू या आजाराने तर झाला नसेल या सशंयाने परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, याबाबत वनविभागास कळवूनही घटनास्थळाकडे कुणीच फिरकले नाही.
कुंभेफळ येथील पशुवैद्यकीय दवाखान्याचे डाॅक्टर गणेश सुरे यांनी घटनेचा पंचनामा करीत या पक्षांचे नमुने तपासणीसाठी औरंगाबाद येथील प्रयोगशाळेत पाठवले. याचा अहवाल आल्यानंतरच या पक्षांच्या मृत्यूचे नेमके कारण सांगता येईल असे सुरे यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.