वाळूजमध्ये लाखभर लोकांसाठी तीन रेशन दुकाने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 06:50 PM2018-11-11T18:50:30+5:302018-11-11T18:50:51+5:30
वाळूज महानगर : बजाजनगर-वडगावची लोकसंख्या एक लाखावर पोहचली असून, या भागात केवळ तीनच स्वस्त धान्य दुकाने आहेत. त्यामुळे स्वस्त अन्न धान्य खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडत असते. स्वस्त अन्न धान्य मिळत नसल्यामुळे अनेक कामगारांना खुल्या बाजारातून महागड्या भावाने अन्न-धान्याची खरेदी करावी लागत आहे. या परिसरात स्वस्त धान्याची वाढीव दुकाने सुरु करण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे.

उद्योगनगरीमुळे बजाजनगर व वडगावची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. आजघडीला परिसराची लोकसंख्या एक लाखावर पोहचली आहे. बहुतांश कामगार कंत्राटी पद्धतीने मिळेल ती कामे करुन कुटुंबाचा उदरनिर्वाहर करतात. या भागात वडगाव येथे एक तर बजाजनगरात दोन स्वस्त धान्य दुकाने आहेत. या तीनही दुकानांत अन्नधान्य खरेदीसाठी नागरिकांची कायम झुंबड उडते. अनेकांना कामाला दांडी मारुन स्वस्त अन्न-धान्य खरेदीसाठी दुकानावर तासन-तास प्रतिक्षा करावी लागते. स्वस्त धान्य दुकानासमोर लांबच-लांब रांगा लागत असल्याने शिधापत्रिकाधारक त्रस्त झाले आहेत.
शिधापत्रिका असुनही धान्य वेळेवर मिळत नसल्यामुळे नागरिकात नाराजीचा सूर आहे. या परिसरात स्वस्त धान्य दुकानाची संख्या वाढविण्यात यावी, यासाठी पंचायत समिती सदस्य सतीश पाटील, विश्वंभर सदमे, धनराज पवार, रविंद्र माळी, विजय सुर्यवंशी, बजरंग पाटील आदींनी पुरवठा विभागाकडे पाठपुरावा केला आहे. वाढीव स्वस्त दुकाने सुरु करण्यासाठी यापूर्वी ग्रामसभेत ठराव पारित करुन तहसीलदार व पुरवठा विभागाकडे प्रस्ताव सादर करण्यात आले आहे.
मात्र स्वस्त धान्याची दुकानांची संख्या वाढविण्यात पुरवठा विभागाकडून टोलवा-टोलवी केली जात असल्याने कामगारांत संतापाचे वातावरण पसरले आहे. पुरवठा विभागातील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे.
खुल्या बाजारातून धान्याची खरेदी
परिसरातील तीन स्वस्त धान्य दुकानांसमोर कायम गर्दी होत असल्याने कामगारांची परवड होत आहे. अनेक शिधापत्रिकाधारक कामगारांना खुल्या बाजारातून धान्याची खरेदी करावी लागत आहे. स्वस्त धान्य दुकानाची संख्या वाढविण्याची मागणी कामगार वर्गातून केली जात आहे.