जलपरीच्या तीन फेऱ्या झाल्या रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2016 11:36 PM2016-05-23T23:36:36+5:302016-05-23T23:47:44+5:30
लातूर : मिरजहून २५ लाख लिटर पाणी घेऊन येणारी जलपरी गेल्या दोन दिवसांपासून लातूरला आली नसल्याने शहरात ५० लाख लिटर पाण्याची तूट निर्माण झाली आहे़
लातूर : मिरजहून २५ लाख लिटर पाणी घेऊन येणारी जलपरी गेल्या दोन दिवसांपासून लातूरला आली नसल्याने शहरात ५० लाख लिटर पाण्याची तूट निर्माण झाली आहे़ आवक कमी आणि जावक अधिक असल्याने मनपा प्रशासन अडचणीत सापडले आहे़ रविवार व सोमवारी जलपरी आली नसल्याने मनपा प्रशासनाने डोंगरगाव, बेलकुंड येथून टँकरद्वारे जवळपास १२ लाख लिटर पाणी जास्त आणले आहे़ दोन दिवस चोवीस तास टँकर चालणार आहेत़ मंगळवारची शक्यता असली तरी खात्री नसल्याचे सांगण्यात आले़
मिरजेतून ज्या वारणेच्या पात्रातून म्हैसाळ योजनेतून लातूरसाठी पाणी उपसले जाते तेथील पाणी संपले आहे. त्यामुळे लातूर महानगरपालिका अडचणीत आली आहे़ शनिवारी ५० वॅगन भरुन उशिरा जलपरी आल्याने रविवारचा दिवस पाणी वितरणात कसल्याही प्रकारची अडचण निर्माण झाली नाही़ दरम्यान वारणा नदीच्या पात्रात म्हैसाळ योजनेतून लातूरला पाणी देण्यासाठी आता वारणा धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. ते पाणी सोमवारी दुपारपर्यंत तरी पोहचले नव्हते़ त्यामुळे रविवार व सोमवार दोन दिवस जलपरी आली नाही़ मंगळवारी सकाळी पाणी पोहचले तर उशिरा का होईना जलपरी लातुरात येणार आहे़ अन्यथा तिसऱ्या दिवशीही मनपा प्रशासनाला पाण्यासाठी स्थानिक स्त्रोतातून अधिक उपसा करावा लागणार आहे़ दोन दिवस जलपरी आली नसल्याने जवळपास ५० लाख लिटर पाण्याचा तुटवडा निर्माण झाला आहे़ अचानक तूट निर्माण झाल्याने मनपा आयुक्त सुधाकर तेलंग यांनी रविवारी २४ तास टँकर चालविण्याचे आदेश बजावले़ त्यानुसार डोंगरगाव व बेलकुंड येथून ३०० टँकर पाणी आणण्यात आले आहे़ परिणामी, पाणी वितरणात फारसा परिणाम झाला नसला तरी मनपाकडे ठेवण्यात आलेले राखीव ५ ते १० लाख लिटर पाणी आता संपले आहे़ मंगळवारी जलपरी न आल्यास मात्र काहीसा तुटवडा निर्माण होऊ शकतो, अशी शक्यता मनपा प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे़
डोंगरगाव, बेलकुंडच्या फेऱ्या वाढल्या...
लातूर शहराला डोंगरगावातून दररोज १५ लाख लिटर आणि माकणी धरणातून दररोज ३५ लाख लिटर पाणी उचलले जाते. रेल्वेचे पाणी बंद झाल्यामुळे टँकरच्या फेऱ्यात वाढ करण्यात आली आहे़ एरवी २०० ते २२५ टँकरच्या फेऱ्या होत होत्या, रेल्वेचे पाणी बंद झाल्याने ३०० फेऱ्या करण्यात आल्या आहेत़ यातून १० ते १२ लाख लिटर पाणी अधिक घेतले आहे़ शनिवारी उशिरा आलेल्या जलपरीचे पाणी रविवारी वितरण करण्यात आले़ सोमवारी स्थानिक स्त्रोतातून पाण्याचे संकलन वाढविण्यात आले असले तरी २५ लाख लिटरची तूट भरून काढणे शक्य नसल्याने मनपा अडचणीत सापडली आहे़ मंगळवारी प्रशासनाची धावपळ होणार आहे़
आता शिल्लक साठा नाही : आयुक्त सुधाकर तेलंग
मिरजहून दोन दिवसांपासून जलपरी आली नाही़ परिणामी, ५० लाख लिटर पाणी कमी झाले आहे़ शनिवारी सायंकाळी जलपरी आल्याने रविवारी पाणी वितरणात अडचण निर्माण झाली नाही़ सोमवारीही रेल्वे येणार नसल्याची शक्यता लक्षात घेऊन डोंगरगाव व बेलकुंड येथून दररोज २०० ते २२० फेऱ्या व्हायच्या़ रविवारी टँकरच्या फेऱ्या वाढविण्यात आल्याने ३०० फेऱ्या झाल्या आहेत़ २४ तास टँकरने पाणी घेण्यात आले असून जवळपास १२ लाख लिटर पाणी अधिक आले आहे़ मंगळवारी रेल्वे येऊ शकते, जर आलीच नाही तर काही प्रमाणात शहरात तुटवडा निर्माण होईल़ बुधवारी मात्र रेल्वे येणार असून पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे मनपा आयुक्त सुधाकर तेलंग यांनी सांगितले़