सिडकोच्या राजीव गांधी स्टेडियम भागात पार्किंग, सामासिक अंतरातील तीन दुकाने पाडली
By मुजीब देवणीकर | Published: November 18, 2023 01:17 PM2023-11-18T13:17:09+5:302023-11-18T13:22:06+5:30
१२ व्यापाऱ्यांच्या दुकानासमोरील अतिक्रमण हटविले
छत्रपती संभाजीनगर : सिडको एन- ५ भागातील गुलमोहर कॉलनी राजीव गांधी स्टेडियम भागात सामासिक अंतर, पार्किंगच्या जागेत रामराव तरटे यांनी तीन दुकाने, पाठीमागे ३५ बाय १० आकारात आणखी अतिक्रमण केले होते. शुक्रवारी सकाळी महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने तीन दुकानांवर कारवाईचा बडगा उगारला. त्याचप्रमाणे भागातील १२ व्यापाऱ्यांनी दुकानांसमोर अतिक्रमण केले होते. त्यांचेही अतिक्रमण काढण्यात आले.
खंडपीठाच्या आदेशानुसार सिडको-हडको भागात अतिक्रमणांवर कारवाई करण्यात येत आहे. मार्च २०२३ मध्ये रामराव तरटे यांनाही अतिक्रमणासंदर्भात नोटीस दिली होती. या नोटिसीला त्यांनी मनपा न्यायालयात आव्हान दिले होते. सुनावणीनंतर न्यायालयाने मनाई हुकूम दिला नव्हता. त्यानुसार ही कारवाई प्रस्तावित करण्यात आली. तत्पूर्वी उपायुक्त मंगेश देवरे, सहायक आयुक्त तथा पदनिर्देशित अधिकारी सविता सोनवणे, अर्जुन गिरामे यांनी पाहणी केली. मालक, भाडेकरू यांना साहित्य काढण्याची सूचना केली. त्यांना दुपारी दोन वाजेपर्यंत वेळ देण्यात आला. सामान काढल्यानंतर जेसीबीच्या साह्याने अतिक्रमण काढण्यात आले.
राजीव गांधी स्टेडियमलगत १२ व्यापाऱ्यांनी १० बाय १० बाय आकाराचे मोठे ओटे बांधून रस्ता अडविला होता. सर्व अतिक्रमणे काढून ग्राहकांना पार्किंगची जागा मोकळी करून देण्यात आली. ही कारवाई प्रशासक जी. श्रीकांत यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी यांच्या मार्गदर्शनानुसार उपायुक्त मंगेश देवरे, पदनिर्देशित अधिकारी सविता सोनवणे, निरीक्षक सय्यद जमशेद यांनी केली. शनिवारीसुद्धा मोहीम सुरू राहणार असल्याचे मनपाने कळविले आहे.