सिल्लोडमध्ये तीन कत्तलखान्यांवर धाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2017 01:07 AM2017-12-24T01:07:55+5:302017-12-24T01:09:40+5:30
सिल्लोड शहरात अवैधरीत्या सुरु असलेल्या तीन कत्तलखान्यांवर शनिवारी उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश बिराजदार यांनी छापा मारून अठरा वाहनांसह तब्बल चाळीस टन मांस जप्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
सिल्लोड : सिल्लोड शहरात अवैधरीत्या सुरु असलेल्या तीन कत्तलखान्यांवर शनिवारी उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश बिराजदार यांनी छापा मारून अठरा वाहनांसह तब्बल चाळीस टन मांस जप्त केले. तर कत्तलीसाठी टेम्पोत भरून आणलेली सात जनावरे व कत्तलखान्यात बांधून ठेवलेली जिवंत ११ जनावरे अशी एकूण अठरा जनावरेही पोलिसांनी ताब्यात घेतली.
तब्बल दीड कोटी रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी छापा मारून ताब्यात घेतला आहे. एवढ्या मोठ्या कारवाईने शहरात खळबळ उडाली आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी बिराजदार हे आपल्या घराकडून कार्यालयाकडे जात असताना त्यांना जनावरे भरून जात असलेला टेम्पो दिसल्याने त्यांनी त्यास थांबण्याचा इशारा केला; मात्र टेम्पोचालकाने वाहन न थांबवता भरधाव शहरातील ईदगाहकडे पळ काढला. बिराजदार यांनी त्याचा पाठलाग केला असता ईदगाहजवळ चालकाने टेम्पो थांबवून तेथून पळ काढला. बिराजदार यांनी टेम्पोची तपासणी केली असता त्यात सात जनावरे असल्याचे दिसल्याने त्यांनी टेम्पो जनावरासह ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात लावला.
या कारवाईत दोन ट्रक अंदाजे किंमत १५ लाख रुपये, पाच टेम्पो अंदाजे किंमत २० लाख, चार बोलेरो पिकअप अंदाजे किंमत १६ लाख, एक टोयोटा क्वालिस गाडी अंदाजे किंमत ४ लाख, एक सेंट्रो कार अंदाजे किंमत २ लाख, तीन आयशर वाहने अंदाजे किंमत २४ लाख, एक बजाज पल्सर मोटारसायकल अंदाजे किंमत २० हजार, एक टेम्पो अंदाजे किंमत ५ लाख, १८ जिवंत जनावरे अंदाजे किंमत १ लाख ८० हजार तसेच तब्बल ४० टन मांस अंदाजे किंमत ५६ लाख रुपये असा एकूण १ कोटी ४४ लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. पोलिसांची कुणकुण लागताच आरोपी फरार झाले. यातील सर्व आरोपींना लवकरात लवकर पकडण्यासाठी यंत्रणा कामाला लावली असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश बिराजदार यांनी सांगितले.
मुंबई व विदेशात मांस रवाना
सदर मांस हे सिल्लोडहून मुंबई व नंतर विदेशात नेण्यात येते, अशी प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. ईदगाह रोडवरील ५ पैकी ३ कत्तलखान्यावर शनिवारी धाडी घालण्यात आल्या. रात्री उशीरापर्यंत गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.
असा आला संशय
बिराजदार यांनी जनावरे भरलेला टेम्पो ईदगाहच्या दिशेनेच का गेला याची चौकशी सुरु करुन शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक भगीरथ देशमुख, ग्रामीण पोलीस ठाण्याचे सपोनि. विश्वास पाटील, अजिंठा ठाण्याचे सपोनि. किरण आहेर यांना तातडीने फौजफाट्यासह शहरात बोलावून घेतले व तिन्ही कत्तलखान्यांवर छापा मारला असता त्यांना शेकडो जनावरांची कत्तल झालेली दिसली. सर्वत्र मासच मास दिसल्याने पोलीसही चक्रावून गेले.
जनावरांच्या चरबीचे केले तूप
कत्तलखान्यांची भीषणता पाहून पोलिसांनी तपासाला वेग दिला असता कत्तलखान्यात जवळपास १५० डबे वनस्पती तूप सापडले. हे तूप जनावरांच्या चरबीपासून तयार करण्यात आलेले असून तेही पोलिसांनी जप्त केल्याने मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. पोलिसांनी कारवाई केली तेव्हा त्यांना विरोध करण्यासाठी १०० ते १५० महिला हातात लाठ्या व दगड घेऊन रस्त्यावर उतरल्या होत्या. यामुळे शहरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.