खवल्या मांजराची तस्करी करणारे तिघे वन विभागाच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 05:01 PM2021-08-13T17:01:37+5:302021-08-13T17:02:26+5:30
सोयगाव तालुक्यातील देव्हारी येथील तिघांनी तस्करीच्यासाठी दुर्मिळ प्रजातीचे खवले मांजर पकडले होते.
सोयगाव : राखीव जंगलातील खवल्या मांजराला पकडून तस्करी करणाऱ्या तिघांना अजिंठा वनविभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. वनविभागाच्या पथकाने सावळदबारा (ता.सोयगाव) परिसरात गुरुवार(दि.१२) रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास ही कारवाई केली. आरोपींमध्ये एका १६ वर्षीय विधीसंघर्ष बालकाचा समावेश आहे.
या बाबत वनविभागाकडून प्राप्त माहितीनुसार, सोयगाव तालुक्यातील देव्हारी येथील तिघांनी तस्करीच्या उद्देशाने अत्यंत दुर्मिळ प्रजातीचे खवले मांजर पकडले असल्याची माहिती अजिंठा वनविभागा मिळाली. यावरून वनपरीक्षेत्राच्या पथकाने बनावट ग्राहक तस्कारांकडे पाठवला. आरोपींनी बनावट ग्राहकासोबत ६ लाख ५० हजार रुपयांमध्ये खवले मांजर खरेदीचा सौदा पक्का केला. ५ हजार रुपये आगाऊ घेऊन आरोपींनी गुरुवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास उर्वरित रक्कम घेऊन सावळदबारा परीसरात बोलावले. दरम्यान, अजिंठा वनपरीक्षेत्र विभागाच्या पथकाने सावळदबारातील त्यात जागेत सापळा लावला. खवले मांजर विक्रीसाठी आलेल्या तिघांना नसीर खा लाडखा तडवी (वय २४) अमिर समशेद खा तडवी (वय १८) व एक सोळावर्षीय विधिसंघर्ष बालक (तिघे रा.देव्हारी ता.सोयगाव) यांना विक्रीसाठी आणलेल्या खवल्या मांजरासह ताब्यात घेतले.
विशेष म्हणजे, सुमारे तीन महिन्यांपूर्वीचा खवले मांजर तस्करी प्रकरणात अनाड (ता.सिल्लोड) परिसरात सिल्लोड वनविभागाच्या पथकाने तिघांना अटक केली होती. त्यानंतर आता सोयगाव तालुक्यात तिघांना वनविभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. वाढत्या तस्करीमुळे अजिंठा राखीव जंगलातील खवल्या मांजरांचे अस्तित्व धोक्यात आल्याचे दिसत आहे.