मला घडविण्यात तीन शिक्षकांचे योगदान : चिरंजीव प्रसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2019 07:39 PM2019-09-05T19:39:43+5:302019-09-05T19:41:43+5:30
शिक्षकांमुळेच चिरंजीव प्रसाद पोलीस आयुक्त यांचा सेंट्रल सर्व्हिसेस ते आयपीएस असा प्रवास
औरंगाबाद : गणित आणि विज्ञानाचा पाया शालेय जीवनात पक्का करून घेणारे मोहम्मद आलम सर आणि फिजिक्सचे बी. बी. पांडे यांनी मला घडविण्यासाठी खूप मेहनत घेतली. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेकरिता पाटणा येथील महाविद्यालयाचे संस्कृत विभागप्रमुख डॉ. उमाशंकर शर्मा यांनी केलेले मार्गदर्शन अमूल्यच. या तीन शिक्षकांमुळे मला आयपीएस होता आले. मी आयुष्यभर त्यांचा ऋणी आहे. आपल्या शिक्षकांबद्दल अशी उत्कठ भावना औरंगाबादचे पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी व्यक्त केली.
पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद म्हणाले की, बिहारमधील एका खेड्यात माझे शालेय शिक्षण झाले. तेथे सहावी, सातवीमध्ये शिकत असताना मोहम्मद आलम हे मला शिक्षक होते. आलम सरांनी गणित आणि विज्ञानाचा पाया पक्का करून घेतला. शिवाय त्यांनी मला उर्दूही शिकविले. त्यांची शिकवणी आजही स्मरणात आहे. आलम सरांनी माझ्याकडून गणित आणि विज्ञानाचा पाया मजबूत करून घेतल्याने पुढील शिक्षणासाठी चांगल्या उच्च माध्यमिक शाळेत प्रवेश मिळू शकला. महाविद्यालयात प्रवेश घेतला तेव्हा तेथे उत्तराखंडमधील रहिवासी प्रा. बी. बी. पांडे फिजिक्स शिकवीत. फिजिक्स शिकविण्याची त्यांची पद्धत अप्रतिम होती. त्यांच्यामुळे फिजिक्स समजले. मोहम्मद आलम आणि प्रा. पांडे यांनी मला घडविण्यासाठी खूप कष्ट घेतले.
गतवर्षी औरंगाबाद शहर पोलीस आयुक्तपदी ते रुजू झाले तेव्हा शहरात नुकतीच दंगल झाली होती. कचऱ्यामुळे झालेली पडेगाव, मिटमिटा येथील दंगल आणि राजाबाजार, शहागंज येथे दोन समुदायात झालेल्या दंगलीने शहराचे वातावरण गढूळ झाले होते. अशा परिस्थितीत पदभार स्वीकारल्यानंतर पोलीस आयुक्तांनी शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये जाऊन महिला आणि तरुणांच्या हाताला काम मिळेल, याकरिता पुढाकार घेतला. बेरोजगार तरुणांना सिपेट आणि इंडो जर्मन टूलरूमसारख्या केंद्रीय संस्थेमध्ये तांत्रिक प्रशिक्षण देऊन त्यांना त्यांच्या स्वत:च्या पायावर उभे केले. या संस्थेमधून प्रशिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या तरुणांना विविध कंपन्यांनी नोकरीवर घेतले. यासोबतच गरीब महिलांना शिलाई मशीन वाटप केले. कागदी पिशव्या तयार करण्याचे प्रशिक्षण देऊन त्यांना पिशवी तयार करण्याचे यंत्रे दिली. एवढेच नव्हे तर त्यांना कच्चामाल पुरवून त्यांच्या पिशव्यांना बाजारपेठ मिळवून दिली. पोलीस आयुक्तांच्या या उपक्रमांमुळे सामान्यांपर्यंत पोहोचणारे प्रसाद हे पहिले पोलीस आयुक्त ठरले आहेत. याशिवाय शहरातील कायदा व सुव्यवस्थेला प्राधान्य देऊन त्यांनी भिन्न समाजामधील दरी कमी करण्यासाठी पुढाकार घेतला आणि समाजकंटकांना त्यांची जागा दाखविली.
संस्कृत ऐच्छिक विषय घेऊन युपीएससी
पदवी शिक्षण घेतल्यांनतर सेंट्रल सर्व्हिसमध्ये नोकरी मिळाली. सुमारे साडेचार वर्षे सेंट्रल सर्व्हिसेसमध्ये कार्यरत असताना पाटणा महाविद्यालयात प्रा. उमाशंकर शर्मा ऋषी यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्यासाठी प्रोत्साहित केले. डॉ. उमाशंकर हे संस्कृत विषयांचे तज्ज्ञ होते. त्यांनी मला संस्कृत व्याकरण शिकविले. त्यांच्यामुळे संस्कृतवर प्रभुत्व मिळविता आले आणि पुढे संस्कृत हा ऐच्छिक विषय घेऊन केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झालो. माझ्या जीवनात प्रा. उमाशंकर यांना खूप महत्त्व आहे.
वडील अर्थशास्त्राचे अभ्यासक
शिक्षकांप्रमाणेच माझ्या आयुष्यावर वडिलांची छाप आहे. वडील त्या काळातील अर्थशास्त्रातील एम. ए. होते. माझे शिक्षण उच्च दर्जाच्या शाळा, महाविद्यालयात व्हावे, याकरिता ते सतत प्रयत्नशील राहत.
गावाकडे गेलो की, शिक्षकांना भेटतोच
मोहम्मद आलम सर, बी. बी. पांडे सर आणि प्रा. उमाशंकर शर्मा शिक्षक दिनीच नव्हे तर कायम स्मरणात राहणारे व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांच्यामुळेच आज मी येथे आहे, अशी भावना सतत मनात येते. यामुळे शिक्षक दिनी तर या महान माणसांची आठवण तर येते, अशी कृतज्ञतेची भावना चिरंजीव प्रसाद यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली. आदर्श तीन शिक्षकांपैकी पांडे यांचे एका दुघर्टनेत निधन झाले. गावाकडे गेल्यानंतर आलम सर आणि उमाशंकर सर यांना आवर्जून भेटतो. बऱ्याचदा त्यांच्यासोबत फोनवरही बोलतो.
( शब्दांकन : बापू सोळुंके )