तीन चोरट्यांचा प्रताप, पत्ता विचारण्याच्या बहाण्याने साडेतीन तोळ्यांचे मंगळसूत्र हिसकावले
By राम शिनगारे | Published: December 15, 2022 08:03 PM2022-12-15T20:03:13+5:302022-12-15T20:04:08+5:30
चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून वेदांतनगर पोलिसांचा तपास सुरू आहे
औरंगाबाद : देवदर्शन करून घरी पायी चालत जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील साडेतीन तोळ्यांचे मंगळसूत्र हिसकावल्याची घटना बन्सीलालनगर येथे गुरुवारी सकाळी ९ वाजता घडली. या प्रकरणी तीन चोरट्यांच्या विरोधात वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आल्याची माहिती निरीक्षक सुशीलकुमार जुमडे यांनी दिली. मंगळसूत्र हिसकावणारे चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.
बन्सीलालनगर येथील गार्डनमध्ये असलेल्या गणपती मंदिरात दर्शन करून पायी घरी जात असताना शीतल सत्यजित लालसरे (रा. उमाजी कॉलनी, बन्सीलालनगर) यांच्याजवळ एक दुचाकी थांबवली. त्या दुचाकीवरील तिघांपैकी एकाने खाली उतरून शीतल यांच्याकडे गायकवाड नावाच्या व्यक्तीचा पत्ता विचारला. पत्ता माहिती नाही, असे सांगताच त्याने शीतल यांच्या गळ्यातील अडीच तोळ्यांचे मंगळसूत्र व एक तोळ्याची सोन्याची चेन हिसकावली. दागिने चोरट्याच्या हातात पडताच त्याने दुचाकीकडे धाव घेतली. दोन्ही दागिन्यांचा काही भाग शीतल यांच्या हातात राहिला. शीतल यांनी आरडाओरड केली. नागरिक येईपर्यंत चोरटे दुचाकीवर बसून निघून गेले. घटनेची माहिती समजताच उपायुक्त दीपक गिऱ्हे, सहायक आयुक्त अशोक थोरात, निरीक्षक सुशीलकुमार जुमडे यांच्यासह अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी शीतल यांच्या तक्रारीवरून वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. अधिक तपास सहायक निरीक्षक अनिल कंकाळ करीत आहेत.
चोरटे सीसीटीव्हीत कैद
महिलेचे मंगळसूत्र चोरणारे तिन्ही चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. मंगळसूत्र हिसकावल्यानंतर पैठण रोडकडे पळून जात त्या मार्गेच शहरातून ते बाहेर पडल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला. पुन्हा एकदा मंगळसूत्र चोरी झाल्यामुळे शहर पोलिसही सतर्क झाले आहेत. आरोपींच्या शोधासाठी वेदांतनगरसह गुन्हे शाखेचे पोलिस प्रयत्न करीत आहेत.