पाच वर्षांत खोदल्या पावणेतीन हजार विहिरी; अल्पभूधारक शेतकरी अजूनही लाभापासून वंचित
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2022 05:31 PM2022-10-05T17:31:44+5:302022-10-05T17:33:00+5:30
दोन विहिरींतील ५०० फूट अंतराची मर्यादा ठरतेय अडसर
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेंतर्गत मागील पाच वर्षांत जिल्ह्यातील मागासवर्गीय शेतकऱ्यांना २ हजार ८३५ विहिरी घेता आल्या. तथापि, अल्पभूधारक शेतकऱ्यांना रब्बी हंगामातही पिके घेता यावीत, यासाठी विहिरी खोदण्याची इच्छा आहे; परंतु दोन विहिरीतील ५०० फूट अंतराच्या मर्यादेमुळे इच्छा असूनही अनेकजण या विहिरीच्या लाभापासून वंचित राहिले आहेत.
तथापि, जि.प.चे कृषी विकास अधिकारी प्रकाश देशमुख यांनी सांगितले की, सिंचन विहिरींसाठी देखील ५०० फूट अंतराची ही जाचक अट आहे. ती कमी करण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू आहेत. जि. प. मार्फत विशेष घटक योजनेंतर्गत राबविण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना या दोन्ही योजनांतर्गत विहिरींसाठीची अंतराची ही मर्यादा कमी करण्याची शासनाकडे मागणी करण्यात आली आहे. ही मागणी मंजूर झाल्यास अनेकांना विहिरींचा लाभ घेणे सुकर होईल.
अनु. जातीच्या शेतकऱ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, तर अनु. जमातीच्या शेतकऱ्यांसाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेंतर्गत विहिरीसाठी अनुदान दिले जाते. मागासवर्गीय शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणे आणि त्यांच्या शेतीला शाश्वत सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने या योजना अंमलात आणल्या. त्यानुसार सन २०१७-१८ ते २०२१-२२ या पाच वर्षांत दोन्ही योजनांमध्ये जिल्ह्यात एकूण २ हजार ८३५ विहिरी उभारण्यात आल्या. त्यावर ५४ कोटी १५ लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. सन २०२१-२२ मधील विहिरींची कामे मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे, तर सन २०२२-२३ या वर्षात ४५० शेतकऱ्यांनी विहिरींसाठी ऑनलाइन अर्ज केलेले आहेत. जिल्हा नियोजन समितीची बैठक न झाल्यामुळे त्यांची प्रशासकीय मान्यता प्रलंबित आहे.
भूजल पातळी
जिल्ह्यात सरासरी १२.३५ मीटर खोल एवढी भूजल पातळी आहे. अलीकडच्या काही वर्षांत पावसाचे प्रमाण वाढल्यामुळे भूजल पातळीत वाढ झाली आहे. शेतात विंधन विहिरीपेक्षा विहीर खोदणे पर्यावरणाच्या दृष्टीने हिताचे आहे. भूजल सर्वेक्षण विभागाचाही हाच अभिप्राय आहे. विंधन विहिरींमुळे भूगर्भातील खोलवरचे पाणी उपसले जात असल्यामुळे भूजलाची पातळी खोल जात आहे. दुसरीकडे, विहिरींमुळे पावसाचे पडणारे पाणी साचले जाते. पाण्याचे झरे सगळीकडे पाझरतात. पाणीपातळी सुरक्षित राहते.
कृषी स्वावलंबन योजना वर्ष- विहिरी
२०१७-१८- ४९०
२०१८-१९- ६९४
२०१९-२०- ५९८
२०२०-२१- ४९७
२०२१-२२- १६५
कृषी क्रांती योजना वर्ष- विहिरी
२०१७-१८- १६
२०१८-१९- १६७
२०१९-२०- १३२
२०२०-२१- ७२
२०२१-२२- ०४