व्हाइटनरच्या नशेत तरुणाने रोखल्या तीन रेल्वे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2019 04:02 AM2019-08-16T04:02:09+5:302019-08-16T04:41:54+5:30
व्हाइटनरची नशा करून आत्महत्येसाठी रेल्वे रुळावर आलेल्या तरुणामुळे औरंगाबादेत तीन रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत झाले.
औरंगाबाद : व्हाइटनरची नशा करून आत्महत्येसाठी रेल्वे रुळावर आलेल्या तरुणामुळे औरंगाबादेत तीन रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत झाले. नागरिकांनी समजूत काढूनही तरुण रेल्वे रुळाकडे जात असल्याने गोंधळ उडाला. त्यामुळे पोलिसांना पाचारण करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेतले.
व्हाइटनर प्राशन केलेला एक तरुण आत्महत्या करण्यासाठी औरंगाबादमधील देवानगरी येथील रेल्वे क्रॉसिंग गेटजवळ आला. परिसरातील नागरिकांनी त्या तरुणाला रोखण्याचे प्रयत्न केले. रेल्वे रुळावर गर्दी दिसल्याने येत असलेली ओखा-रामेश्वरम एक्स्प्रेस थांबवण्यात आली. यादरम्यान, नागरिकांनी तरुणांची समजूत काढली. घरी जातो, असे सांगून तो घटनास्थळावरून निघून गेला. मात्र, थोड्या वेळाने पुन्हा तेथे आला. या वेळी नगरसोल-नांदेड गाडी जात असताना समोर येऊन उभा राहिला. रेल्वे थांबवून काही जणांनी त्याची समजूत काढली. तो परत गेला आणि थोड्या वेळाने मनमाड-काचिगुडा रेल्वे गाडीसमोर येऊन थांबला. त्यानंतर नागरिक आणि प्रवाशांनी पोलिसांना संपर्क करून घटनेची माहिती दिली.
पोलिसांनी त्या तरुणाला ताब्यात घेईपर्यंत हा गोंधळ सुरूच होता. या तरुणाकडील जवळपास चार हजार रुपये आणि मोबाइल काही मुलांनी काढून घेतला. तसेच त्याच्या अंगावर खाज येणारी काचकुरीही टाकली, असे त्या तरुणाने चौकशीत सांगितले. त्यामुळेच तो आत्महत्या करण्यासाठी रेल्वेरुळावर आला होता.