सिडकोतील चौकात वाहतुकीचे तीनतेरा
By Admin | Published: June 19, 2014 12:35 AM2014-06-19T00:35:18+5:302014-06-19T00:51:29+5:30
साहेबराव हिवराळे , औरंगाबाद सिडको, हडको परिसरातील वाहतूक सिग्नलचे तीनतेरा वाजले असून, शाळा सुरू झाल्यामुळे तर वाहतुकीत आणखी भर पडली आहे.
साहेबराव हिवराळे , औरंगाबाद
सिडको, हडको परिसरातील वाहतूक सिग्नलचे तीनतेरा वाजले असून, शाळा सुरू झाल्यामुळे तर वाहतुकीत आणखी भर पडली आहे.
जालना रोडवरील मुकुंदवाडी चौक, प्रोझोन मॉलसमोर, जालना रोडवरील चौक, सिडको बसस्थानक, एन-३ समोरील अग्रसेन चौकातील सिग्नल बंद, तर गारखेड्यातील गजानन मंदिर चौकात सुरू आहेत.
सूतगिरणी चौकात बंद, हडको- सिडकोतील होळकर चौकातील सिग्नल सुरू, तर टीव्ही सेंटर येथील सिग्नल बंद आहेत. हर्सूल टी-पॉइंटवर सिग्नल नाही; परंतु सिडको पोलीस ठाण्याने सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. कॅमेऱ्यात कोंडीचे चित्रण होऊनही पोलीस मात्र तेथे हस्तक्षेप करीत नाहीत. जळगाव रोडवरील एन-१ च्या चौकातील सिग्नल रस्त्याच्या कामामुळे बंद असल्याचे वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांंनी सांगितले. या चौकात सिनेमा थिअटर्स असून मॉल तसेच कारखान्यांत ये-जा करणाऱ्यांची सतत वर्दळ असते.
नियंत्रणासाठी एकही सिग्नल अथवा कर्मचारी नाही
बजरंग चौकातील सिग्नलही बंदच असून, आंबेडकर चौक, नवीन मोंढ्यात व पिसादेवीकडे जाणाऱ्यांची संख्या खूप आहे. वाहतूक मोठ्या प्रमाणात असूनही येथे नियंत्रण ठेवण्यासाठी एकही सिग्नल अथवा वाहतूक कर्मचारी दिसत नाही. चौकालगतच वाहतूक शाखेचे कार्यालय असले तरी ते अधिकाऱ्यांनाही वाहतूक प्रश्नाचे गांभीर्य वाटत नसल्याचे दिसते.
बळीराम हायस्कूल चौक, अधिकारी मेस, यशोधरा कॉलनी, आझाद चौक, एन-६, चिश्तिया चौक, गरवारे स्टेडियम चौक, गुलमोहर कॉलनी या ठिकाणी पिवळा दिवा असलेले सिग्नल लागतच नाहीत. त्यामुळे अपघात होण्याची भीती नगरसेवक सुरेश इंगळे, रिपाइंचे शहराध्यक्ष विजय मगरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील जगताप, शिवसेनेचे कमलाकर जगताप, काँग्रेसचे अशोक डोळस यांनी व्यक्त केली. अधिकारी म्हणतात की, मनपाकडून दुरुस्ती होत नाही. विजेअभावी अनेक सिग्नल बंद असून, बेशिस्त वाहनचालकांवर दंडात्मक कारवाईचे काम सुरूच आहे.
सिग्नलची गरज
वाहने बेशिस्तपणे चौकात कोणत्याही दिशेने पळविले जातात.
कामगारांना सुरक्षिततेसाठी मुकुंदवाडीतील सिग्नल गरजेचे.
जळगाव रोडवरील सिडको कार्यालयासमोरील बँकेच्या चौकातील सिग्नल सुरू करा.
आंबेडकर चौकात सिग्नलच नसल्याने कोंडी वाढते.
टीव्ही सेंटर हडकोतील चौकातील सिग्नल अनेक दिवसांपासून बंद.
सूतगिरणी गारखेडा चौकातील सिग्नल देखावा.
गजानन महाराज मंदिर चौकातील सिग्नल अनेकांना गोंधळात टाकतात.