आईच्या मागे रस्ता ओलांडणाऱ्या तीनवर्षीय बालकाला ट्रकने चिरडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2020 07:21 PM2020-01-28T19:21:28+5:302020-01-28T19:22:29+5:30
या भीषण अपघातात बालक रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहून संतप्त नागरिकांनी ट्रकचालकला बेदम मारहाण केली
औरंगाबाद : आईच्या मागे रस्ता ओलांडणाऱ्या तीनवर्षीय बालकाला हायवा ट्रकने चिरडल्याची घटना पैठण रोडवरील नक्षत्रवाडी गावात सोमवारी दुपारी पावणेचार वाजेच्या सुमारास घडली. याविषयी सातारा ठाण्यात ट्रकचालकाविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला.
संघर्ष लक्ष्मण पागोरे (३, रा.नक्षत्रवाडी), असे मृत बालकाचे नाव आहे. या घटनेत संघर्षची आई चांदणी पागोरे या जखमी झाल्या असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सातारा पोलिसांनी सांगितले की, नक्षत्रवाडी येथील रहिवासी चांदणी लक्ष्मण पागोरे या मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. सोमवारी दुपारी पावणेचार वाजेच्या सुमारास त्या मुलगा संघर्षसह पैठण रोड ओलांडत होत्या. त्यावेळी पैठणकडून खडी घेऊन जाणाऱ्या सुसाट ट्रकने त्यांना धडक दिली. या घटनेत संघर्ष ट्रकच्या चाकाखाली आल्याने घटनास्थळीच ठार झाला, तर चांदणी यांच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली.
या भीषण अपघातात बालक रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहून संतप्त नागरिकांनी ट्रकचालकला बेदम मारहाण केली आणि ट्रकवर दगडफेक केली. या घटनेची माहिती मिळताच सातारा पोलीस ठाण्याचे निरीक्षक विठ्ठल पोटे, उपनिरीक्षक सिरसाट आणि वाहतूक शाखेचे निरीक्षक दादासाहेब सिनगारे आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जमावाच्या तावडीतून ट्रकचालकाला ताब्यात घेतले, तसेच मृत चिमुकल्याचा मृतदेह आणि जखमी चांदणी यांना तात्काळ घाटी रुग्णालयात दाखल केले.
चालकाला अटक
याविषयी मृत संघर्षचा चुलतभाऊ नितेश दादासाहेब पागोरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून ट्रकचालक सय्यद ख्वाजा नबी हसन (२७, रा. नवनाथनगर) याच्याविरोधात सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. मारहाणीत जखमी झालेल्या ट्रकचालकावर घाटीत उपचार केल्यानंतर त्याला अटक केली.
जमावाने हायवा ट्रकवर केली दगडफे क
हायवा ट्रकने चिमुकल्याला चिरडल्याचे समजताच नक्षत्रवाडीतील संतप्त नागरिक घटनास्थळी दाखल झाले. यावेळी जमावाने दगडफेक केल्याने ट्रकच्या केबिनच्या काचा फुटल्या. शिवाय वाहतूककोंडी झाली होती. वाहतूक पोलिसांनी रस्त्यावरील अपघातग्रस्त हायवा ट्रक जप्त केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.