औरंगाबाद देणार राज्याला नव्या २६१ ‘लाल परी’; पहिल्या बसचा मान नाशिकला
By संतोष हिरेमठ | Published: January 4, 2023 11:52 PM2023-01-04T23:52:43+5:302023-01-04T23:54:58+5:30
औरंगाबादकर थोडं थांबा, पहिल्या ‘लाल परी’चा मान नाशिकला
औरंगाबाद : तब्बल तीन वर्षांनंतर तयार झालेल्या औरंगाबादेतीलएसटी महामंडळाच्या चिकलठाणा मध्यवर्ती कार्यशाळेतील पहिली बस मिळविण्याची शर्यत नाशिक विभागाने जिंकली. ही पहिली बस मिळविण्यासाठी औरंगाबाद विभागाकडून जोरदार प्रयत्न करण्यात आले. नव्या बससाठी औरंगाबादकरांना थोडीशी वाट पाहावी लागणार आहे.
चिकलठाणा मध्यवर्ती कार्यशाळेत गेल्या तीन वर्षांपासून नवीन चेसीस नसल्याने नव्या बसगाड्यांची निर्मिती पूर्णपणे थांबलेली होती. त्यामुळे केवळ जुन्या लाल बसच्या चेसीसवर स्टील बाॅडीची बस बांधणी केली जात होती. एसटी प्रवाशांना नवीन बस मिळणेच बंद झाले होते. अखेर ऑक्टोबरमध्ये कार्यशाळेला पुन्हा एकदा नव्या चेसीस मिळण्यास सुरुवात झाली. मार्चपर्यंत नव्या चेसीसवर २६१ बस बांधण्यात येणार आहेत. या बसेस राज्यभरात पाठविण्यात येणार आहे. पहिली बस तयार झाली असून गुरुवारी नाशिकला रवाना होणार असल्याची माहिती चिकलठाणा मध्यवर्ती कार्यशाळा व्यवस्थापक प्रमोद जगताप यांनी दिली.
कशी आहे नवीन बस?
नवीन बस ही ११ मीटर लांबीची आहे. आसनाची संख्या ४४ आहे. नव्या बसमधील पाठीमागील जागेत पाट्याऐवजी एअर सस्पेन्शन आहे. त्यामुळे बस खड्ड्यांमधून जाताना प्रवाशांना फारसा त्रास होणार नाही. जुन्या साध्या बसचा दरवाजा हा पुढील चाकाच्या पाठीमागे आहे, परंतु नव्या बसचा दरवाजा हा चाकाच्या पुढे आहे. नव्या बसच्या दरवाजाचा बहुतांश भाग काचेचा आहे.