दहावीचा पेपर दिला अन् शेत तळ्यात पोहायला गेले, तिघांचा मृत्यू तर दोघे सुदैवाने बचावले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2022 10:05 PM2022-03-30T22:05:08+5:302022-03-30T22:06:06+5:30
औरंगाबाद जिल्ह्यातील अजिंठा येथे शेत तळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दहावीच्या तीन मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
श्यामकुमार पुरे
सिल्लोड: औरंगाबाद जिल्ह्यातील अजिंठा येथील बसस्थानकाच्या पाठीमागे असलेल्या अनाड रस्त्याजवळ एका शेतातील शेत तळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दहावी कक्षेतील तिन्ही मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यादरम्यान तर इतर दोघे थोडक्यात बचावले. बुधवारी(30 मार्च) दुपारी 3 वाजेच्या सुमारास ही घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, उमेरखान नासिरखांन पठान(वय १६, रा.उर्दू शाळेजवळ अजिंठा), शेख मोहमद अनस हब्दुल हाफिज(वय १६, रा.उर्दूशाळेजवळ अजिंठा) आणि अक्रमखान आयुबखान पठान(वय १६ वर्ष रा.बगीचा मज्जीत समोर अजिंठा) असे मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत. तर, रेहान खान इरफान खान(वय १६ वर्ष रा.अजिंठा) आणि फैजानखान शफीखान(वय १६ वर्ष रा.अजिंठा) हे या घटनेतून बचावले आहेत.
ठिबकच्या नळीने केला घात...
ही पाच मुले बुधवारी सकाळी १०:३० वाजता अजिंठा येथील उर्दू शाळेत सायन्स सेकंडचा पेपर देण्यासाठी गेले होते. १ वाजता त्यांनी पेपर दिला आणि दुपारी घरात काही एक न सांगता अनाड रोडवरील अजिंठा येथील सतीश चव्हाण यांच्या शेतातील तळ्यात पोहण्यासाठी उतरले. सर्व पाच मुलांना पोहता येत नव्हते मात्र ते नेहमी एका झाडाला ठिबकची नळी पकडून याच शेत तळ्यात आंघोळ करत असत. मात्र आज आंघोळ करत आतांना ती नळी तुटली आणि तिघांचा बुडून अंत झाला, तर दोघे बालंबाल बचावले.
दोघांनी त्या तिघांना वाचवण्याचा प्रयत्न केला...
मयत झालेले तिघे आधी शेत तळ्यात उतरले आणि त्यांना पोहता येत नसल्याने त्यांनी गटांगळ्या खाल्या. हे दृश्य त्याच्या सोबत असलेल्या दोन्ही मित्रानी बघितले. रेहणखान या मित्राने त्यां तिघांना वाचविण्यासाठी त्यांच्या पायाचा आधार देण्याचा प्रयत्न केला. पाय धरून त्या तिन्ही मुलांनी वर येण्याचा प्रयत्न केला पण दैव खराब असल्याने ज्या मुलाचे पाय पकडून ते वरती येण्याचा प्रयत्न करत होते, तोच शेततळ्यात घसरत पाण्यात बुडाला.
नंतर हे सर्व होत असताना पाचवा मित्र फैजानखान त्यांना वाचविण्यासाठी ठिबक नळी पकडून पाण्यात गेला पण पाणी जवळपास १० ते १२ फूट खोल असल्याने त्याला त्यांना बाहेर काढणे जमले नाही. त्याने लगेच कसे तरी बाहेर येऊन शेजारी पाजारी असलेल्या काही लोकांना मदतीसाठी बोलावले पण त्यांना सुद्धा पोहता येत नसल्याने त्यांनी आणखी काही लोकांना बोलावून आणले. अखेर चांगले पोहणारे लोकांनी पाण्यात उड्या घेतल्या पण तो पर्यंत तिघांची प्राण ज्योत मावळली होती.
या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी विजय मराठे, सहायक पोलीस निरीक्षक अजित विसपुते, अक्रम पठाण, शेळके यांनी घटनास्थळी भेट दिली अजिंठा पोलीस ठाण्यात या प्रकरणी पोलीस पाटील यांच्या तक्रारी वरून अकस्मात मृत्यू दाखल करण्यात आला असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी विजय मराठे यांनी लोकमत ला दिली.