विकतच्या पाण्यावर भागतेय तहान !
By Admin | Published: April 4, 2016 12:31 AM2016-04-04T00:31:53+5:302016-04-04T00:40:19+5:30
बालाजी थेटे , औराद शहाजानी २५ हजार लोकसंख्या असलेले औराद शहाजानी हे गाव दोन नद्यांच्या संगमावरील तीन कोल्हापूरी पाटबंधाऱ्याच्या कुशीत असतानाही
बालाजी थेटे , औराद शहाजानी
२५ हजार लोकसंख्या असलेले औराद शहाजानी हे गाव दोन नद्यांच्या संगमावरील तीन कोल्हापूरी पाटबंधाऱ्याच्या कुशीत असतानाही गेल्या तीन महिन्यांपासून गावातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे़ गेल्या दोन महिन्यांत ग्रामपंचायतीने दोनदा १० टँकरची मागणी करुन प्रशासनाकडे प्रस्तावही सादर केला़ पण अद्याप एकही सरकारी टँकर गावात सुरु झाले नाही़ त्यामुळे गावकऱ्यांना आपली तहान खाजगी ४ टँकर व ६० लहान टमटमच्या विकतच्या पाण्यावर भागवावी लागत आहे़
तेरणा- मांजरा संगमावरील औराद शहाजानी हे ग्रीन बेल्ट म्हणून नावारूपाला आले आहे़ हा परिसर नेहमी हिरवा शालू पांघरलेला होता़ पण सततच्या दुष्काळामुळे मांजरा, तेरणा कोरड्या पडल्याने यावरील आठही कोल्हापुरी बंधारे कोरडी पडली आहेत़ ३ हजार हेक्टर जमीन कायमस्वरूपी सिंचन क्षेत्राखाली होती़ परंतु, गेल्या तीन वर्षांत पाण्याअभावी वाळवंटासाखरी परिस्थिती झाली आहे़ सिंचन तर सोडाच पण पिण्यासाठी घागरभर पाणी मिळणेही कठीण झाले आहे़
औरादच्या योजना निम्या गावात नळयोजना आहे़ या नळाला महिन्याला एकदा पाणी येत असले तरी केवळ काही मिनिटेच पाणीपुरवठा होतो़ ग्रामपंचायत मालकीचे ४१ बोअर आहेत़ यापैकी ३४ बोअर बंद पडले आहेत़ ७ विंधन विहिरी थोडाफार वेळ चालतात़ ग्रामपंचायतीने २६ जानेवारीला पंचायत समितीकडे १० टँकर व १० विंधन विहिर अधिग्रहण करण्याची मागणी करुन प्रस्तावही सादर केला़ पण त्यानंतर तहसीलदारांनी औराद शहराची पाहणी करून टँकर ऐवजी जवळच्या विंधन विहिरी अधिग्रहण करून पाणीपुरवठा करण्याच्या सूचना केल्या़ त्यानंतर तीन विंधन विहिरी अधिग्रहण केल्याचे ग्रामविकास अधिकारी टी़ डी़ बिराजदार म्हणाले़
पुन्हा १५ मार्चला ग्रामपंचायतीने चार टँकर सुरु करावेत, अशी मागणी केली आहे़ पण प्रशासनाने पाहणी करण्यात निम्मा उन्हाळा घालवला़ पण मागणीचे टँकर काही कागदावरून जमिनीवर आलेच नाहीत़