छत्रपती संभाजीनगरात रात्री हत्येचा थरार; पाच जणांनी घेरुन तरुणावर केले कोयता, चाकूचे वार
By सुमित डोळे | Published: October 15, 2024 07:21 PM2024-10-15T19:21:23+5:302024-10-15T19:21:39+5:30
पोलिसांत तक्रार दिल्याचा राग, तरुणाला रात्री घराबाहेर काढत पाच जणांनी केली हत्या
छत्रपती संभाजीनगर : जुने वाद व पोलिसांकडे तक्रार केल्याच्या रागातून सुमित काशिनाथ जावळे (१७) या तरुणाची सहा जणांनी मिळून क्रुर हत्या केली. बेगमपुऱ्यातील आम्रपालीनगरच्या मोनूज हॉटेल मागे सोमवारी रात्री १२ वाजता हत्येचा हा थरार घडला. याप्रकरणी गुन्हे शाखेने एका संशयिताला ताब्यात घेतल्याचे सुत्रांनी सांगितले.
ऋतिक उर्फ छोटू चव्हाण, जिता टाक, ऋषी चव्हाण, एक अल्पवयीन आणि ऋतिकची आई पुनम विजय चव्हाण यांच्यावर याप्रकरणी सुमितच्या वडिलांच्या तक्रारीवरुन बेगमपुरा पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत सुमित व आरोपींमध्ये दिड महिन्यांपूर्वी घाटी परिसरात क्रिकेट खेळताना वाद झाले होते. त्यात जखमी झालेल्या सुमितने पोलिसांकडे तक्रार केली होती. सोमवारी रात्री ११ वाजता मात्र त्यांनी सुमितला घराबाहेर बोलावले. मोनूज हॉटेल मागे आरोपींनी सुमितवर हल्ला चढवला. 'तेरा बॉहत हो गया, पोलिस स्टेशन मे कंम्प्लेंट क्यु देता है' असे म्हणत त्यांनी दांडे, चाकू व काेयत्याने सुमितवर वार केले. यामुळे सुमित रक्तबंबाळ अवस्थेत खाली कोसळला. गळ्याजवळच चाकू, कोयत्याचा खोलवर वार झाल्याने सुमितचा मृत्यू झाला.
आई चिथावणी देत होती
चव्हाणची आई पूनम हत्येसाठी चिथावणी देत असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. १३ ऑक्टोबर रोजी देखील पूनमने अन्य आरोपींसह सुमितच्या घरी जाऊन जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप मृत सुमितच्या वडिलांनी केला आहे. आरोपींमध्ये एक संशयित अल्पवयीन असून एक ताब्यात घेतला आहे. अन्य आरोपींचा बेगमपुरा पोलिस व गुन्हे शाखा शोध घेत असल्याचे निरीक्षक मंगेश जगताप यांनी सांगितले. सहायक निरीक्षक शेषराव खटाणे अधिक तपास करत आहेत.