सिल्लेखाना चौकात थरार ; जुन्या वादातून कार अडवून केला तलवारीने हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 05:54 PM2019-05-31T17:54:56+5:302019-05-31T17:54:56+5:30
तुंबळ हाणामारीत दोन्ही गटांतील चार जण जखमी
औरंगाबाद : जुन्या वादातून सिल्लेखाना चौकात दोन गटांत तलवारीने हाणामारी झाली. यात चार जण जखमी झाले. ही घटना गुरुवारी (दि.३०) दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. गस्तीवरील पोलिसांच्या दंगाकाबू पथकाने हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला.
या हल्ल्यात चार जण जखमी झाले असून, जखमींना पोलिसांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. परमेश्वर वाघ (४५, रा. आडगाव-निपाणी), नितीन प्रकाश जाधव (४२, रा. रेणुकानगर, शिवाजीनगर) यांच्यात वर्षभरापूर्वी शिवाजीनगर भागात वाद झाला होता. त्यावेळी वाघने जाधववर प्राणघातक हल्ला केला होता. याप्रकरणी जवाहरनगर ठाण्यात गुन्हाही दाखल झाला होता. गुरुवारी न्यायालयात सुनावणी असल्यामुळे वाघ हा रामेश्वर तुकाराम गवारे, शार्दूल सुरेश गावंडे यांच्यासोबत कारने (एमएच-२० बीएन-६८०६) जिल्हा न्यायालयात आले होते, तर नितीन जाधव हादेखील आपल्या साथीदारासोबत न्यायालयात कारने (एमएच-२० एच-१२११) आला होता.
न्यायालयात पुढची तारीख मिळाल्याने वाघ आणि त्याचे साथीराद कारमधून वरद गणेश मंदिर चौक, सिल्लेखानामार्गे जात होते. त्यावेळी कारमधून पाठलाग करणाऱ्या जाधवने वाघला सिल्लेखाना चौकात अडविले. त्यानंतर आपल्या जवळील तलवारीने वाघ याच्यावर हल्ला केला. या घटनेत परमेश्वर वाघ आणि त्याच्यासोबत असलेले रामेश्वर गवारे, शार्दूल गावंडे हे दोघे जखमी झाले. माहिती मिळताच क्रांतीचौक ठाण्याचे सहायक निरीक्षक राहुल सूर्यतळ, उपनिरीक्षक महादेव गायकवाड, सोनवणे यांच्या पथकाने धाव घेऊन जखमींना उपचारासाठी दाखल केले.
पोलिसांमुळे अनर्थ टळला
सिल्लेखाना चौकात ही हाणामारी सुरू असताना गस्तीवर असलेले सिडको विभागाचे दंगा नियंत्रण पथक घटनास्थळी दाखल झाले. दंगा नियंत्रण पथकातील कर्मचाऱ्यांनी तात्काळ कारवाई करीत हाणामारी करणाऱ्या आरोपींना पकडले. दंगा नियंत्रण पथक वेळीच घटनास्थळी दाखल झाले नसते, तर मोठी दुर्घटना घडली असती, अशी माहिती क्रांतीचौक पोलीस ठाण्याचे निरीक्षक उत्तम मुळक यांनी दिली.