थरारक! मध्यरात्री ढाब्यावर मारहाण करत रोकड लुटणाऱ्या तिघांना पाठलाग करून पकडले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2023 11:56 AM2023-11-16T11:56:31+5:302023-11-16T11:56:57+5:30
तिन्ही आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर शहरात सुध्दा अनेक गुन्हे दाखल आहेत.
कायगाव : छत्रपती संभाजीनगर ते अहमदनगर महामार्गावरील भेंडाळा फाटानजीक ढाबा मालकाला मारहाण करत चोरट्यांनी गल्ल्यातील ९ हजार ७०० रुपयांची चोरी केल्याची घटना बुधवारी पहाटे १ वाजेच्या सुमारास झाली. चोरीची माहिती मिळताच गंगापूर पोलिसांनी पाठलाग करत तिन्ही चोरट्यांना अवघ्या तीन तासातच जेरबंद केले.
याबाबत गंगापूर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बुधवारी पहाटे १ वाजेच्या सुमारास भेंडाळा फाट्यानजीक महाराष्ट्र ढाब्यावर तिघेजण घुसले. कॅश काउंटर जवळ झोपलेले हॉटेल मालक फेरोज सांडू शेख (रा. ढोरेगाव) यांना लोखंडी सळईने मारहाण केली. तसेच चाकूचा धाक दाखवून जबरदस्तीने गल्यातील ९ हजार ७०० रूपये रोख काढून घेतले. त्यानंतर तिन्ही चोरटे दुचाकीवरून (एमएच- २०- डीपी- ५६४६) पसार झाले.
याबाबत हॉटेल मालक फेरोज सांडू शेख यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. पोनि. सत्यजीत ताईतवाले पथकासह तात्काळ घटनास्थळी पोहोचले. तिन्ही चोरटे छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने सुसाट वेगात गेल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सर्व रस्त्यांवर नाकाबंदी केली. पोनि. ताईतवाले पथकासह शोध घेत असताना अहमदनगर ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावरिल ईसारवाडी फाट्यानजीक एका बंद पेट्रोलपंपजवळ काही जणांची संशयित हालचाल निदर्शनास आली. पोलीसांनी वाहन दूर उभे करत पेट्रोलपंपाच्या दिशेने धाव घेतली.
यावेळी धाब्यावर चोरी करून पसार झालेले चोरटे आणि त्यांची दुचाकी आढळून आली. पोलिसांनी परिसराला घेराव घातला. मात्र, चाहूल लागल्याने आरोपींनी अंधाराचा फायदा घेत शेतात पळ काढला. पोलीसांनी देखील अंधारात चोरट्यांचा पाठलाग केला. तिन्ही आरोपींना पोलिसांनी पहाटे ४.३० वाजता शिताफिने मुसक्या आवळून जेरबंद केले.
तपासात आरोपींची नावे जुबेर नासेर शेख, शेख ईरफान सरवर, रिझवान पाशेखान (सर्व रा. नेहरूनगर, कटकटगेट, हत्तीसिंगपुरा, छत्रपती संभाजीनगर) असल्याचे निष्पन्न झाले. त्यांनी ढाब्यावर चोरी केल्याचे कबूल केले. त्यांच्या ताब्यातुन चोरून नेलेले ९ हजार ७०० रूपये रोख, तीन मोबाईल, दुचाकी, चाकू असा एकूण ६३ हजार ७०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आरोपींच्याविरुध्द गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तिन्ही आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर शहरात सुध्दा अनेक गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई पोनि. सत्यजीत ताईतवाले, उपनिरीक्षक अजहर शेख, पोलीस अंमलदार दिनकर थोरे, गंगावणे, अभिजीत डहाळे, अमोल कांबळे, तेनसिंग राठोड यांनी केली.