कारमधून लोणावळा ते औरंगाबाद ‘घोणस’ चित्तथरारक प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:04 AM2021-07-25T04:04:26+5:302021-07-25T04:04:26+5:30
औरंगाबाद : कारमधून लोणावळा ते औरंगाबाद असा सुमारे ३०० किलोमीटरचा प्रवास करून आलेला दुर्मिळ विषारी ‘हिरवा घोणस’ साप ...
औरंगाबाद : कारमधून लोणावळा ते औरंगाबाद असा सुमारे ३०० किलोमीटरचा प्रवास करून आलेला दुर्मिळ विषारी ‘हिरवा घोणस’ साप शनिवारी दुपारी सर्पमित्राने पकडून तो सुरक्षितपणे वनविभागाच्या स्वाधीन करण्यात आला. तथापि, या जातीच्या सापाचे वास्तव्य प्रामुख्याने जंगलातील झाडावर असल्यामुळे तो या भागातील नसल्याचा दावा वनरक्षक एच. के. गुसिंगे यांनी केला आहे.
आशिष मेहता (रा. उल्कानगरी) हे दोन दिवसापूर्वी कामानिमित्त लोणावळा येथे गेले होते. तेथे त्यांनी एका हॉटेलच्या पार्किंगमध्ये आपली कार उभी केली. त्यावेळी कारमध्ये साप शिरला असावा. ते काल औरंगाबादेत परतले. तेव्हा एकाने त्यांच्या कारच्या व्हील कॅपमध्ये साप जात असल्याचे पाहिले व ही बाब त्यांनी मेहता यांना सांगितली. मेहता यांनी लगेच सर्पमित्र श्रीकांत वाहुळे यांना बोलावून घेतले. वाहुळे यांनी त्या सापाला सुरक्षितपणे बाहेर काढले.
औरंगाबादमध्ये या जातीचा साप सर्पमित्र श्रीकांत वाहुळे यांनी पहिल्यांदाच पाहिला. सापाची खात्री करून घेण्यासाठी वन्यजीव अभ्यासक आदि गुडे यांना त्यांनी बोलावून घेतले. गुडे यांनी हा साप पाहून तो ‘हिरवा घोणस’ असल्याचे सांगितले. त्यानंतर त्या सापाला वनविभागाचे वनरक्षक एच. के. गुसिंगे यांच्याकडे सुपूर्द केले.
चौकट.........
जंगलात झाडावर वास्तव्य...
हा साप अतिशय दुर्मिळ प्रजातीमध्ये मोडतो. याचे वास्तव्य जंगलातील झाडावर असून त्याचे प्रमुख खाद्य हे पक्षी, त्यांची अंडी, पिल्ले असते, असे वनरक्षक एच. के. गुसिंगे यांनी सांगितले. (फोटो)